कोल्हापूर: शॉपी फोडून आयफोनसह सुमारे १२ लाखाचे मोबाईल लंपास, तिघा चोरट्यांस अटक
By सचिन भोसले | Published: July 21, 2022 07:33 PM2022-07-21T19:33:13+5:302022-07-21T19:40:37+5:30
सीसीटीव्हीच्या आधारावर, मोबाइल लोकेशन, कोगनोळी टोलनाक्यावरील फुटेजचा वापर करून पोलिसांनी चोरीचा लावला छडा
कोल्हापूर : निपाणी शहरात नवीन मोबाइल शॉपी टाकण्यासाठी ११ लाख ६५ हजारांचे ७० हँडसेट चोरणाऱ्या टोळीस शाहूपुरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. या चोरीचा सीसीटीव्हीच्या आधारावर, मोबाइल लोकेशन, कोगनोळी टोलनाक्यावरील फुटेज अशा साधनांचा वापर करून पोलिसांनी छडा लावल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.
सूरज आनंदा परिट (वय १८), अमर संजय नाईक (वय १८ रा. दोघे नागनुरबारबै, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), ऋषिकेश गोवर्धन महाजन (वय १८, रा. कोर्णी, ता. चिक्कोडी, बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
गुरुवारी (दि.१४) रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेम्स स्टोन इमारतीमधील निखिल नांगावकर यांची मोबाइल शॉपी फोडून चोरट्याने नव्या व जुन्या आयफोनसह ७० नग चोरून नेले. शाहूपुरी पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता. इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी चोरी केल्याचे दिसून आले. यावरून पोलिसांनी संशयितांचा माग काढून तिघांना अटक केली.