घनकचरा प्रकल्पाचे वाजवले तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:14 AM2021-02-19T04:14:17+5:302021-02-19T04:14:17+5:30

निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे एखाद्या चांगल्या चाललेल्या प्रकल्पाचे तीन तेरा कसे वाजतात याचे उदाहरण म्हणजे लाईन बाजार येथील घनकचरा व्यवस्थापन ...

Three thirteen of the solid waste project rang | घनकचरा प्रकल्पाचे वाजवले तीन तेरा

घनकचरा प्रकल्पाचे वाजवले तीन तेरा

Next

निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे एखाद्या चांगल्या चाललेल्या प्रकल्पाचे तीन तेरा कसे वाजतात याचे उदाहरण म्हणजे लाईन बाजार येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. रोज सरासरी १५० ते १८० टन कचरा निर्माण होत असताना महापालिकेचा आरोग्य विभाग गेल्या महिन्यापासून प्रकल्प बंद असताना गप्पच कसा बसू शकतो, उद्या ठेकेदाराने काम सोडून दिले तर अधिकारी हाताची घडी घालून बघतच राहणार का, असे प्रश्न यानिमित्ताने तयार झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा व बेफिकिरीमुळे हा प्रकल्प बंद झाला आहे.

-कचऱ्याच्या ढिगात बुडाला प्रकल्प-

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पस्थळावर काही इमारती बांधल्या आहेत. या इमारतीच्या अवती-भोवती कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे त्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. प्रकल्पाकडे कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी सर्किट हाऊसकडून रस्ता आहे. आणखी काही दिवस प्रकल्प सुरू झाला नाही तर या रस्त्यावर कचरा टाकावा लागेल, इतकी गंभीर परिस्थिती आहे.

-ओल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी-

प्रकल्पस्थळावर कचरा टाकण्यास जागाच नसल्याने डोझर व पोकलॅन्डच्या सहाय्याने कचरा मागे ढकलून पन्नास साठ फूट उंचीचे डोंगर रचला जाऊ लागला आहे. सगळा कचरा ओला असल्याने आणि त्यावर योग्यवेळी प्रक्रिया होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

-एक ट्रीपसाठी तीन तासाचे वेटिंग-

शहराच्या विविध भागातून टीपर रिक्षा, डंपर, आर. सी. अशा वाहनांतून कचरा गोळा करून तो प्रकल्पस्थळावर आणला जातो. पण आता जागा नसल्याने सर्व वाहनांना तसेच कर्मचाऱ्यांना कचरा टाकण्यास जागा तयार होईपर्यंत तीन-तीन तास वेटिंग करावे लागत आहे.

-प्रकल्प चांगला पण दुर्लक्ष वाईट -

प्रकल्पस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पाचे काम चांगले असून तो बंद राहण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही. पण कंपनीने निधी देण्याचे काम थांबविले असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे काम थांबविले आहे. दैनंदिन मेंटेनन्स करता आलेला नाही. आर्थिक अडचणीमुळे प्रकल्प बंद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पॉईटर -

-प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीचे नाव - कोल्हापूर ग्रीन एनर्जी प्रा. लि.

- प्रकल्पाचे काम २०१२ पासून सुरू झाले.

- कंपनीला महापालिका एक टनास ३०८ रुपये प्रोसेसिंग फी देते.

- प्रकल्पावर ३० टन बायोगॅस निर्मिती क्षमता

- ८० टन आरडीएफ - इंधन तयार करण्याची क्षमता.

- प्रतिदिन ७० टन खतनिर्मिती

Web Title: Three thirteen of the solid waste project rang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.