ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:22+5:302020-12-30T04:32:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची झुंबड उडाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुुरू असून, ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २६, गुरुवारी ५०० अर्ज आले; मात्र शुक्रवारी ख्रिसमस, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुकांची व समर्थकांची झुंबड उडाली होती. इच्छुकांसोबत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक असा गोतावळा आला होता. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती कार्यालयात सादर करायची होती. यावेळी अर्ज भरून घेताना महसूलच्या कर्मचाऱ्यांचीही कसरत होत होती. उमेदवारांना माहिती देणे, अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले जात होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन हजार ९५३ व्यक्तींनी तीन हजार ३७ अर्ज भरले. अशारीतीने तीन दिवसांत तीन हजार ४६९ इच्छुकांनी तीन हजार ५६३ अर्ज भरले आहेत.
--
तालुक्याचे नाव : अर्ज भरणारे व्यक्ती : अर्जांची संख्या
शाहूवाडी : १२४ : १२४
पन्हाळा : ३४२ : ३४२
हातकणंगले : १८५ : १९३
शिरोळ : ४८१ : ४८२
करवीर : ३७९ : ४१०
गगनबावडा : २४ : २७
राधानगरी : १४३ : १४७
कागल : ५९० : ५९४
भुदरगड : ११५ : १२२
आजरा : १५० : १५२
गडहिंग्लज : २६७ : २९०
चंदगड : १५३ : १५४
एकूण : २ हजार ९५३ : ३ हजार ३७
----
फाेटो ओळी स्वतंत्र पाठविल्या आहेत.