तीन हजार वाहक-चालकांचा रोज लाखो प्रवाशांशी संर्पक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:29+5:302021-02-25T04:30:29+5:30
कोल्हापूर : लाॅकडाऊनपूर्वीप्रमाणेच एसटीची लालपरी पुन्हा रुळावर येऊ लागली असून, रोज तीन हजार चालक-वाहक रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. ...
कोल्हापूर : लाॅकडाऊनपूर्वीप्रमाणेच एसटीची लालपरी पुन्हा रुळावर येऊ लागली असून, रोज तीन हजार चालक-वाहक रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. यात सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांशी या कर्मचाऱ्यांचा संपर्क येऊ लागला आहे. कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाहक-चालकांसह प्रवाशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर आगाराच्या ७०० बस राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत धावत आहे.
लाॅकडाऊनच्या काळात ६० ते ७० दिवस एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक सीट सोडून प्रवाशांना तालुकाअंतर्गत प्रवासाला मुभा दिली. सर्व प्रवाशांची थर्मल टेस्ट केल्यानंतर त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यानंतर आता पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू आहे. यात राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच गोवा, उत्तर कर्नाटक, आंध्र आदी ठिकाणी ही सेवा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, चंदगड, आजरा, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले, शिरोळ, गारगोटी, मुरगुड, राधानगरी आदी ठिकाणी प्रवासी वाहतुकीला उत्तम प्रतिसाद आहे. केवळ गगनबावडा मार्गावरील वाहतुकीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद आहे. सर्वच आगारातून सातशे बस रात्रं-दिवस असून, त्यांच्याकडून किमान दोन ते अडीच लाख किलोमीटरचे अंतर पार केले जाते. एकूणच सर्व परिस्थिती पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाल्यास एसटी महामंडळाचे कंबरडे मोडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे.
विनामास्क प्रवास
अनेक प्रवासी विनामास्क बसमधून प्रवास करतात. त्यांना वाहकाने हटकले की, त्यांच्याबरोबर वादावादी करणे, असे प्रकार वारंवार होतात. यापूर्वी महामंडळाकडून प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात होती. मात्र, ती मागे पडली. आता सर्वच आलबेल असल्यासारखे सर्व प्रवासी वावरत आहेत.
लसीकरण अद्यापही नाही
सद्य:स्थितीत कोल्हापूर विभागात चालक (१५००), वाहक (१५००), असे तीन हजार कर्मचारी एसटी बसमधून लाखो प्रवाशांसोबत दिवस-रात्र असतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात या विभागात आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोविशिल्ड लस देणे गरजेची बाब आहे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
बस -७००
फेऱ्या - ४५००
कि.मी. अंतर - २ ते २.५० लाख अंतर रोज
प्रवासी संख्या : १ लाख ७५ हजार ते दोन लाख इतकी
कोट
कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत वरिष्ठ अथवा जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही सूचना अथवा आदेश आलेला नाही. तो आल्यास त्वरित अंमलबजावणी करू. सद्य:स्थितीत आमचे सर्व कर्मचारी योग्य ती काळजी घेऊनच काम करीत आहेत.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग.