तीन हजार कोल्हापूरकरांनी घेतला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:34+5:302021-07-10T04:16:34+5:30

कोल्हापूर : कोल्हापुरातून परदेशात शिक्षण, नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत २,९१५ जणांनी असे एक ...

Three thousand Kolhapurites obtained international driving licenses | तीन हजार कोल्हापूरकरांनी घेतला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

तीन हजार कोल्हापूरकरांनी घेतला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

Next

कोल्हापूर : कोल्हापुरातून परदेशात शिक्षण, नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत २,९१५ जणांनी असे एक वर्षाच्या कालावधीसाठी वाहन चालविण्याचे आंतरराष्ट्रीय परवाने काढले. सरासरी २९० जण प्रतिवर्षी असे परवाने काढत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे परदेशात जाण्याचा आणि आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना काढण्याचा वेग मंदावला आहे.

कोल्हापुरातून शेकडो विद्यार्थी दरवर्षी अमेरिका, इंग्लड, स्वीत्झर्लंड,जर्मनी, फ्रान्स, अरब अमिरात, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, आदी देशांत उच्च शिक्षणासाठी जातात तर तितक्याच प्रमाणात नोकरीसाठीही जातात. अशा विद्यार्थी व नोकरदार मंडळींना परदेशातही आपली चारचाकी लागते. कारण परदेशात ४०० ते ५०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शिवाय वाहन चालविण्याबाबतचे नियम अत्यंत कडक आहेत. तेथील नियमांना अधिन राहून भारतातही असे आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना व्हिसा, आधारकार्ड, पासपोर्ट, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर मिळतो. मुदत संपल्यानंतर ते परदेशातून मायदेशी आले तर पुन्हा मुदतवाढ करून घेतात. अन्यथा मागील वर्षीपासून परराष्ट्र मंत्रालयाने ज्या देशात उमेदवार असेल, त्या देशातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जाऊन या परवान्याचे नूतनीकरण करता येते. त्याकरिता तेथे दुप्पट शुल्क आकारले जाते.

इंटरनॅशनल लायसन्स

२०१२ - २०३

२०१३ - ४६३

२०१४ - ३९८

२०१५ - ४२१

२०१६ - ३०१

२०१७ - ४५१

२०१८- ३५५

२०१९- २०७

२०२०- ७९

२०२१ - ३७

मुदत एक वर्ष अथवा व्हिसा मुदत असेपर्यंत

सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवान्याची मुदत एक वर्षाची असते. त्यानंतर या लायसन्सची मुदत आपोआप संपते. जर हा परदेशस्थ भारतीय पुन्हा मायदेशी आला आणि त्याने भारतातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुन्हा सर्व योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतर पुन्हा एक वर्षाचा परवाना मिळू शकतो. ज्या भारतीयांना पुन्हा मायदेशी येणे शक्य नसते, त्यांच्याकरिता भारत सरकारने त्या-त्या देशातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात मुदतवाढ मिळण्याची सोय केली आहे. त्याकरिता एक वर्षाचा परवाना हवा असेल तर दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते.

कागदपत्रे

व्हिसा, पासपोर्ट, आधारकार्ड, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना व एक हजार रुपये शुल्क भरल्यानंतर हा परवाना कुठल्याही भारतीय नागरिकाला मिळू शकतो.

व्हिसा असेल तरच मिळतो परवाना

ज्या उमेदवाराकडे परदेशातील व्हिसा, पासपोर्ट, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना असेल तर त्याला एक वर्षाच्या मुदतीकरिता असा परवाना मिळू शकतो. हा परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून उपप्रादेशिक अथवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहीने मिळू शकतो.

कोट

कोरोना संसर्गामुळे कोल्हापुरातून परदेशात नोकरी, शिक्षणाकरिता जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.

- रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

Web Title: Three thousand Kolhapurites obtained international driving licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.