Kolhapur: राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून तिघा पर्यटकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:21 PM2024-05-30T17:21:41+5:302024-05-30T17:22:04+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश लक्ष्मण टिपुगडे ...
गौरव सांगावकर
राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश लक्ष्मण टिपुगडे (वय २६, मूळ गाव रा. भैरीबांबर ता. राधानगरी, सध्या रा. कागल ), अश्विनी राजेंद्र मालवेकर (३२, मूळ गाव सावर्डे ता. कागल सध्या रा. तळंगदे), प्रतिक्षा राजेंद्र मालवेकर (१३) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतिश टिपुगडे, अश्विनी मालवेकर, प्रतिक्षा मालवेकर हे सर्वजण राधानगरी पर्यटनासाठी काल, बुधवार दि. २९ रोजी भेटवाडी येथे आले होते. तेथे जेवणाचा बेत असल्याने सतीशने आपल्या नातेवाईकांच्या घरात भाकरी करण्यास सांगितले होते. पण रात्री उशीर झाला तरी भाकरी नेण्यास सतिश का आला नाही, हे पाहण्यासाठी नातेवाईकांनी शोधाशोध केली. पण ते आढळले नाहीत.
आज, दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेतला असतात सतीशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. तर शेजारीच आश्विनी व मुलगी प्रतिक्षा यांचा मृतदेह आढळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचे नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास डी.वाय.एस.पी शाहूवाडी विभागाचे आपासो पाटील व पो.नि.संतोष गोरे करीत आहेत.
पर्यटकांनी काळजी घ्यावी
राधानगरी हे पर्यटन स्थळ असून धरण, धबधबे, अभअरण्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. पण पर्यटकांना स्थानिक स्थळांची परिपूर्ण माहिती नसते अशा ठिकाणी पर्यटक जातात आणि दुर्घटना घडते. त्यामुळे पर्यटकांनी माहिती नसलेल्या ठिकाणी जावू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले.