तीन वॉररूम, तरीही सेवा-सुविधासंबंधीच्या तक्रारी बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:06+5:302021-07-14T04:30:06+5:30
कोल्हापूर : कोरोनाकाळात पीडित रुग्णांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि गरजूंना तातडीने मदत मिळवून देण्याकडे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद ...
कोल्हापूर : कोरोनाकाळात पीडित रुग्णांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि गरजूंना तातडीने मदत मिळवून देण्याकडे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या तिन्ही वॉररूमकडे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेच्या वॉररूममध्ये जादा बिलांच्या तक्रारी स्वीकारल्या जातात. इतर दोन वॉररूमध्ये केवळ रिक्त बेडचीच माहिती दिली जाते. सेवासुविधांसंबंधीच्या तक्रारी बेदखल केल्या जात असल्याचे पुढे आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णालयांत आणि कोरोना काळजी केंद्रात दर्जेदार वैद्यकीय सेवा, सुविधा मिळत नसल्याच्या सार्वत्रिक तक्रारी आहेत.
सरकारी दवाखान्यात आणि काही कोरोना काळजी केंद्रात जेवण वेळेवर आणि चांगले दिले जात नाही. स्वच्छता नसते. शौचालय तुंबलेली असतात. रुग्णांच्या नातेवाईकांची वर्दळ असते, अशा सार्वत्रिक तक्रारी ऐकायला मिळतात. पण यासंबंधी तक्रारी दाखल करण्याची व्यवस्था वॉररूमध्ये नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सामान्य, गरीब तक्रारदारांचा आवाज दबलेलाच राहिला आहे. यांना न्यायासाठी विविध सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
१) वॉर रूमकडे तक्रारीची नोंद नाही.
तिन्ही वॉररूमध्ये प्रत्यक्षात जावून माहिती घेतल्यानंतर बेडशिवाय इतर माहिती आणि तक्रारींची नोंद नसल्याचे समोर आले. रोज मोठ्या संख्येने तक्रारी ऐकायला मिळत असतानाही त्याची एकत्रित नोंद ठेवली जात नाही. किती तक्रारी निरसन झाल्या, त्यावर काय कारवाई झाली, याची लेखी माहिती जिल्हा स्तरावरील एकाही वॉररूमध्ये मिळत नाही.
२) औषध मिळत नाही काय करू?
सीपीआर रुग्णालय कोरोनासाठी राखीव आहे. या परिसरात नातेवाईकांचा वावर असतो. अतिक्रमित चहाच्या टपरीवर अनेकवेळा सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला पाहायला मिळतो. सरकारी दवाखान्यांत रुग्णांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. पण यासंबंधीची तक्रार वॉररूमध्ये घेतली जात नाही. परिणाामी औषधे मिळत नाही काय करू, असे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत.
३) नळाला पाणी नाही, आता काय करू?
सरकारी दवाखान्यात आणि कोरोना काळजी केंद्रातील नळाला काहीवेळा पाणी येत नाही. आंघोळीसाठी पुरेशा प्रमाणात गरम पाणी मिळत नाही. जेवणाचा दर्जा नसतो, अशा तक्रारी नोंद करण्यासाठीची व्यवस्था वॉररूमध्ये नाही. अशा तक्रारी घेऊन वॉररूमध्ये गेल्यानंतर येथे फक्त रिक्त बेडसंंबंधीची माहिती मिळेल, असा उलट सल्ला दिला जातो. यामुळे नळाला पाणी नाही, आता काय करू, आदी प्रश्न अनुत्तरितच राहत आहे.
४) वॉररूम प्रमुखाचा कोट
महापालिकेत चार महिन्यांपासून वॉररूम कार्यरत आहे. येथे जादा बिलासंबंधीच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. कोरोनावरील उपचाराचे कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती गरजूंना दिली जाते.
युवराज जबडे, समन्वयक, वॉररूम, महापालिका