कोल्हापूरच्या तीन वर्षीय अन्वीने सर केले कर्नाटकतील सर्वोच शिखर, पहिली छोटी गिर्यारोहक
By संदीप आडनाईक | Published: January 20, 2023 05:24 PM2023-01-20T17:24:19+5:302023-01-20T17:37:40+5:30
१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशीच तिने हा जागतिक विक्रम केला
कोल्हापूर : कोल्हापूरच्या तीन वर्षीय चिमुकली अन्वी घाटगे हिने कर्नाटकातील मुल्यणगिरी हे सर्वोच्च शिखर सर केले. समुद्रसपाटीपासून १९२५ मीटर उंचीवरुन राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या जयंतीदिवशी तिने अभिवादन केले. कर्नाटकातील चिकमंगलुरु येथील हे शिखर सर करणारी ती पहिली छोटी गिर्यारोहक ठरली आहे. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशीच तिने हा जागतिक विक्रम केला आहे.
समुद्रसपाटीपासून ६३१७ फूट उंचीवर हे कर्नाटकातील सर्वात उंच शिखर असलेल्या या ट्रेकच्या चढाईला अन्वीने आई अनिता आणि वडील चेतन घाटगे, मामा रोहन माने, हर्षदा माने, चिकमंगलूर वनविभागाचे वनसंरक्षक उमेश पाटील यांच्यासोबत १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता प्रारंभ केला. भर उन्हात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुल्यानगिरी शिखराच्या पायथ्याच्या सर्पदारी येथून शिखरापर्यंतचा तीन ते चार किलोमीटरचा हा ट्रेक तिने दुपारी अडीच वाजता दोन तास तीस मिनिटांत पार केला. तिथे पोहोचताच तिने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून परिसर दणाणून सोडला.
आई अनिता, वडिल चेतन हे तिच्यासोबत ११ जानेवारी रोजी कोल्हापूरातून रवाना झाले. कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन, उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद, सागर गवते, प्रशासकीय अधिकारी डी.एन शिरसाळ यांनी तिला शुभेच्छा दिल्या. कर्नाटकातील मूल्यनगीरी सर करणारी अन्वी देशातील पहिली आणि सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. चिक्कमंगलुरचे उपवनसंरक्षक एस प्रभाकरन यांनी तिला प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान केला.
दक्षिण भारतातील सात किल्ले केले सर
अन्वी यापूर्वी १४ जानेवारी रोजी केरळ राज्यातील चंद्रगिरीचा किल्ला, बेकल किल्ला, होसदुर्ग, १५ जानेवारी रोजी कन्नूरचा किल्ला, तेल्लीचेरी किल्ला, १७ जानेवारीला पल्लीपुरम् किल्ला, १८ रोजी म्हैसूरचा किल्ला. असे दक्षिणेत भारतातील सात किल्ले सर केलेले आहेत.
यंगेस्ट माऊंटनरचा सन्मान
दोन वर्षे ११ महिन्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केल्याने अन्वीचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड कमिटीने तिला एंगेस्ट माऊंटनर् हा किताब देऊन सन्मानित केले आहे. तिने पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, शिवगड, सामानगड,पारगड, रांगणा, वल्लभगड तसेच खडतर वासोटा असे किल्ले सर केलेले आहेत.