कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लागतील तीन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:13 AM2018-07-09T00:13:49+5:302018-07-09T00:13:53+5:30

Three years for dogs to be broken | कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लागतील तीन वर्षे

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लागतील तीन वर्षे

Next

चंद्रकांत कित्तुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या २० हजारांवर आहे. दररोज २० कुत्र्यांची नसबंदी करायची म्हटले तरी तीन वर्षांहून अधिक काळ लागेल. एका कुत्र्याची नसबंदी करायची म्हटले तर सुमारे १२०० ते १५०० रुपये लागतात म्हणजेच सुमारे तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ही तरतूद करणे महापालिकेसाठी अवघड नाही; पण तशी मानसिकता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवी.
सध्या जीवरक्षा अ‍ॅनिमल ट्रस्ट देणगीच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करत आहे. जोपर्यंत देणगीच्या माध्यमातून पैसा मिळत राहील तोपर्यंत ही मोहीम चालू राहील अन्यथा ती ठप्प होईल. कुत्र्यांपासून नागरिकांची सुटका करायची असेल तर ही मोहीम सातत्याने सुरू राहण्यासाठी निधीची तरतूद करतानाच यासाठी लागेल ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची तयारी करायला हवी. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या उनाड व भटकी कुत्री निर्बिजीकरण केंद्रात सध्या दररोज सरासरी ३ ते ५ कुत्र्यांची नसबंदी होत आहे. नसबंदीनंतर त्यांना रेबिज प्रतिबंधक लसही देण्यात येत आहे. या केंद्रात पशुवैद्यक डॉक्टर आणि त्यांना लागणारे सहाय्यकांची तरतूद करण्यात आली आहे. पावसामुळे ही गती कमी असली तरी पाऊस कमी होताच ही संख्या वाढवली जाईल, असे ‘जीवरक्षा’च्या अध्यक्षा कल्पना भाटिया यांनी सांगितले तर या शस्त्रक्रियांसाठी लागणारी औषधे आणि लस महापालिकेकडून देण्यात येत आहेत, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.
५०० रुपये दंडाचा आदेश कागदावरच
गेल्या महिन्यात चिकन, मटण दुकानांसमोर मोकाट कुत्री आढळल्यास त्या दुकानदाराला प्रत्येक कुत्र्यामागे ५०० रुपये दंड करण्याचा आदेश काढला होता.मात्र, कुणाच्या दुकानासमोर कोणते कुत्रे आहे. हे ओळखायचे कसे, यासह अनेक प्रश्न यावर उपस्थित केले गेले. त्याला होणारा संभाव्य विरोध पाहून हा आदेश कागदावरच ठेवण्यात आला. एकाही दुकानदारावर कारवाई करण्यात आलेली नाही.
तक्रारींची संख्या उपलब्ध नाही
शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेकडे एकच डॉग व्हॅन आहे. दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी आहेत. दररोज सरासरी ८ ते १० कुत्री पकडून ते देत असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेकडे मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार केल्यास डॉग व्हॅन कुत्री पकडायला येते पण या तक्रारींची संख्या उपलब्ध नसल्याचे महापलिकेचे अधिकारी सांगण्यात आले.
अकरा किलोमीटर प्रवासात भटक्या कुत्र्यांच्या १४ टोळ्या
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शिये फाटा ते राजारामपुरी हा अकरा किलोमीटरचा प्रवास मध्यरात्री मोटारसायकलवरून केला असता रस्त्यांवर तब्बल १४ ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या आढळल्या. त्यातील चार ठिकाणी कुत्र्यांनी मोटारसायकलचा पाठलागही केला. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात यावे.

Web Title: Three years for dogs to be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.