Kolhapur: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन वर्षांचा कारावास
By उद्धव गोडसे | Published: April 16, 2024 05:55 PM2024-04-16T17:55:34+5:302024-04-16T17:56:45+5:30
मुलीची आई घरामागे भांडी घासत असताना त्याने स्वयंपाक घरात मुलीचा विनयभंग केला
कोल्हापूर : कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सुरेश हिंदुराव कांबळे (वय ५२, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याला जिल्हा व प्रमुख न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवले.
आज, मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत कांबळे याला तीन वर्षाचा सक्त कारावास, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. विनयभंगाचा गुन्हा १७ ऑगस्ट २०२१ रोजी घडला होता.
विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश कांबळे याचे पीडित मुलीच्या घरी जाणे-येणे होते. १७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी अडीचच्या सुमरास कांबळे हा पीडित मुलीच्या घरात गेला. मुलीची आई घरामागे भांडी घासत असताना त्याने स्वयंपाक घरात मुलीचा विनयभंग केला.
याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून कांबळे याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ॲड. कुलकर्णी यांनी न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर पाच साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य घरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपीस दोषी ठरवले.
बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार त्याला शिक्षा सुनावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश परीट आणि शंकर माने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.