सिंहासनाधिष्ठित अंबाबाई

By admin | Published: October 2, 2016 12:50 AM2016-10-02T00:50:56+5:302016-10-02T00:50:56+5:30

शारदीय नवरात्रौत्सवाला थाटात प्रारंभ : पहिल्याच दिवशी दीड लाख भाविक

Thrissurable Ambabai | सिंहासनाधिष्ठित अंबाबाई

सिंहासनाधिष्ठित अंबाबाई

Next

कोल्हापूर : दुष्टांचे निर्दालन करून आपल्या भक्तांचे रक्षण व पालन करणाऱ्या आदिशक्तीच्या आराधनेच्या शारदीय नवरात्रौत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईची पहिल्या माळेला सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पंचामृताचा अभिषेक, तोफेची सलामी, घटस्थापना, आरती, पालखीपूजन, मंत्रोच्चार अशा धार्मिक व मंगलमय वातावरणाने कोल्हापूरकर अंबेच्या भक्तिरसात न्हाऊन निघाले. रात्री अंबाबाईची पालखी एक शिखर आकारात काढण्यात आली; तर भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीची खडी सालंकृत पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दीड लाख भाविकांनी अंंबाबाईचे दर्शन घेतले.
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेनिमित्त पहाटे पावणेपाच वाजल्यापासून देवीचे दर्शन सुरू करण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीनंतर मूळ घराणे श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी सपत्निक अंबाबाईचा पहिला अभिषेक केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, श्रीमंत मालोजीराजे, मधुरिमाराजे, संयोगिताराजे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, राजलक्ष्मी खानविलकर यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
दुपारची आरती झाल्यानंतर अंबाबाईची सिंहासहानाधिष्ठित अंबाबाई रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यादिवशी घटस्थापना, अखंड नंदादीप, पुष्पमालाबंधन, चंडीपाठ होऊन देवी उपासना, कुळाचाराला व नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असल्याने देवीची बैठी पूजा बांधली जाते. या दिवसापासून महानवमीपर्यंत देवी भक्तांच्या उपासना स्वीकारत सुखाने सिंहासनावर विराजमान होते आणि भक्तांना आशीर्वाद देते, हे या पूजेमधून दर्शविण्यात आले. ही पूजा दिवाकर ठाणेकर, आशुतोष ठाणेकर, सचिन ठाणेकर, मिलिंद दिवाण व प्रसाद लाटकर यांनी बांधली.
मंदिरात दिवसभरात विश्वकर्मा महिला सोंगी भजनी मंडळ, राधा महिला भजनी मंडळ, स्वरमाउली भजनी मंडळ, स्वरानंद संगीत वाद्यवृंद, महालक्ष्मी भजनी मंडळ, शिवशाहू पोवाडा मंच या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी एक शिखर आकारात काढण्यात आली. महापौर अश्विनी रामाणे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पालखीचे पूजन केले. जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानीची सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, सारंग दादर्णे, विजय बनकर यांनी बांधली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला. भक्तिमय वातावरण झाले होते.

 

Web Title: Thrissurable Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.