मांजामुळे चिरला गळा, थोडक्यात बचावल्या डॉक्टर; नेमकं काय घडलं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:27 PM2022-11-20T13:27:57+5:302022-11-20T13:28:10+5:30
हवेत उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगाशी खेळणं प्रत्येकालाच आवडतं; पण पतंगासाठीचा वापरला जाणारा मांजा जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकतो
कोल्हापूर :
हवेत उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगाशी खेळणं प्रत्येकालाच आवडतं; पण पतंगासाठीचा वापरला जाणारा मांजा जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकतो याची प्रचिती कोल्हापुरातील एका डॉक्टरांनाच आली. दुचाकीवरून मुलाला सायंकाळी शाळेतून घरी परत आणणाऱ्या या डॉक्टरांचा वाटेतच मांजामुळे गळाच चिरला गेला. श्वासनलिकेच्या एक मिलिमीटरपेक्षा कमी अंतरावर जखम झाल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या.
कोल्हापुरातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. विद्या सूर्यकिरण वाघ या शनिवारी सायंकाळी यादवनगर ते हुतात्मा पार्क या मार्गावरून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन मुलाला शाळेतून परत घरी घेऊन येत होत्या. अचानक त्यांच्या गळ्याभोवती काहीतरी दोरीसारखं ओढलं गेलं हे लक्षात येईपर्यंत गळ्याला काचल्यासारखं झालं. अंधारात दिसलं नसल्यामुळे हाताने ओढलं तर तो मांजा होता. दहा सेकंदात गाडी रस्त्यातच थांबवताच मागच्या वाहनचालकाने धडक दिली. गळ्याभोवतीचा मांजा काढताना मुलाचाही हात कापला, इतका मांजा धारदार होता. डॉक्टरांचा गळा रक्तबंबाळ झाला होता. ज्याठिकाणी जखम झाली ती जागा श्वासनलिकेच्या एक मिलिमीटरपेक्षा कमी अंतरावर होती. आणखी थोड्या त्या पुढे गेल्या असत्या तर श्वासनलिका तुटली असती आणि जीव गेला असता. प्राथमिक उपचार करून त्यांनी नंतर औषधोपचार घेतले.
अशा घटना आतापर्यंत दुसऱ्यांच्या बाबतीत ऐकल्या होत्या; पण स्वत:वरच ही वेळ आल्यामुळे मृत्यूशी जवळून दर्शन झाले. पतंग उडवताना मांजा वापरु नये. मांजातील अतिशय धारदार काचामुळे सूक्ष्म स्नायूचे तंतू कापले जातात. यातून अनेकांचे जीव गेले आहेत. बंदी असली तरी कोल्हापुरात मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई होत नाही. या प्रवृत्तींवर कारवाई व्हायला हवी.
-डॉ. विद्या सूर्यकिरण वाघ, आयुर्वेद तज्ज्ञ, कोल्हापूर