महानगरपालिका समितीकडून धारेवर
By Admin | Published: May 7, 2016 12:36 AM2016-05-07T00:36:00+5:302016-05-07T00:59:42+5:30
अनुसूचित जाती कल्याण समितीचा सवाल ो
कोल्हापूर : राजेंद्रनगरातील गोरगरीब लोकांच्या झोपड्या कोणाच्या सांगण्यावरून पाडल्या, असा खडा सवाल अनुसूचित जाती कल्याण समितीने विचारताच महानगरपालिका प्रशासनाची भंबेरी उडाली. शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत याच प्रश्नावरून आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांना समितीने धारेवर धरले आणि कायद्याची पुस्तके त्यांच्यासमोर फेकत कोणत्या आधारे कारवाई केली ते सांगा, असा आग्रह धरला.
बैठकीत समिती सदस्यांच्या समोरच नगरसेवक भूपाल शेटे यांनी आयुक्त व अधिकाऱ्यांनी संगनमत करून तसेच सुपारी घेऊन झोपड्या पाडल्याचा आरोप करताच आयुक्त पी. शिवशंकर संतप्त झाले. खोट्या आरोपाबद्दल तुमच्या विरोधात खटला भरण्यात येईल, असा दम त्यांनी शेटे यांना दिला. बैठकीतील वातावरण तापले; परंतु महापालिका प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यास झोपड्या पाडल्याबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय नियुक्त अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे, सदस्य डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश गजबिये, अशा तीन सदस्यांनी शुक्रवारी महानगरपालिकेस भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीस महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, परिवहन समिती सभापती लाला भोसले यांच्यासह अनेक नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अगदी सुरुवातीलाच राजेंद्रनगर झोपडपट्टीतील झोपड्या पाडल्याचा कळीचा मुद्दा उपस्थित झाला. झोपड्या पाडण्यापूर्वी संबंधित लोकांची पर्यायी व्यवस्था करायची असते. याबाबत सौजन्य न दाखविताच अचानक कशी कारवाई केली, कोणाच्या सांगण्यावरून झोपड्या पाडल्या, त्या पाडताना कायद्यातील कोणत्या तरतुदींचा आधार घेतला, असे अनेक प्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांची बोलती बंद करून टाकली. समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले. खालचे अधिकारी काहीही सांगतील, त्यांचे तुम्ही ऐकणार का? असा सवाल आयुक्तांना विचारला गेला. कोणत्या कायद्यानुसार कारवाई केली, हे दाखवा असे म्हणत प्रकाश गजबिये यांनी आयुक्तांसमोर कायद्याचे पुस्तक फेकले. पाडलेल्या झोपड्या २००० सालापूर्वीच्या आहेत, अशी माहिती पुढे आली तेव्हा आयुक्त शिवशंकर यांनी त्या झोपड्या २००४ सालानंतरच्या होत्या, असा खुलासा केला. त्यावेळी खाडे यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, अशी विचारणाही केली. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली त्या उपशहर अभियंता एस. के . माने यांना बोलावून अध्यक्ष खाडे यांनी खरडपट्टी केली. ज्यांना तुम्ही रस्त्यावर आणले, त्यांच्यावरची कारवाई चुकीची आहे, हे स्पष्ट झाले तर तुमच्यावर काय कारवाई करायची? असे सवाल करताच माने यांची भंबेरी उडाली.
दौरा : पंधरा पैकी तीनच सदस्य उपस्थित
अनुसूचित जाती कल्याण समितीवर अध्यक्ष सुरेश खाडे यांच्यासह १५ सदस्यांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून दौऱ्यावर असणाऱ्या या समितीचे खाडे यांच्यासह केवळ तीनच सदस्य महानगरपालिकेतील बैठकीस उपस्थित होते. बैठकीच्या निमित्ताने अल्पोपहार, चहापाणी व्यवस्था मात्र चोख ठेवली होती. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांची ड्युटीच लावण्यात आली होती.