नरकेंच्या भूमिकेने जिल्ह्यात खळबळ
By admin | Published: September 11, 2016 12:14 AM2016-09-11T00:14:30+5:302016-09-11T00:22:52+5:30
मागणी पचनी पडणार का? : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीत नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष, नरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत अरुण नरके यांनी घेतलेल्या उघड भूमिकेने शनिवारी जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली. दिवसभर ‘लोकमत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली. नरके यांच्या भूमिकेला नेतेमंडळी कितपत दाद देतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर ‘अमूल’चे आव्हान परतवून लावण्यासाठी तयार असल्याचे अरुण नरके यांनी जाहीर केले. अरुण नरके हे ज्येष्ठ व अभ्यासू संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत संयमाने राजकारण केल्याने ते गेली चाळीस वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यांनी आताच अशी आक्रमक भूमिका घेण्यामागे नेमकी कारणे काय असू शकतात, याचीही चर्चा सुरू आहे. त्यात करवीरसह जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीपासून आपण अलिप्त राहण्याचे जाहीर करून त्यांनी दुसरा धक्का दिला आहे. करवीरच्या राजकारणात लक्ष देणार नसल्याचे सांगत पी. एन. पाटील यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे आमदार असल्याने चंद्रदीप नरके यांनी स्वत:चा बेस तयार केला आहे, असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना वाटते. ‘गोकुळ’चा इतिहास पाहिला तर आतापर्यंत नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मागणी केली जात होती; पण पहिल्यांदाच नरके यांनी प्रसारमाध्यमांतून मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी नेत्यांना पचनी पडणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
करवीर, कुंभी परिसरात चर्चा!
नरके यांच्या
भूमिकेचे पडसाद कुंभी-कासारी साखर कारखाना व करवीर मतदारसंघात
उमटले आहेत.
त्यांच्या भूमिकेने
नरके गटाच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.
गोकुळचा अध्यक्ष बदलायचा की नाही याबाबत आमची कोणतीच अद्याप चर्चा झालेली नाही. त्यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा झाल्यास पी. एन. पाटील यांच्याशी बोलूनच घेऊ, पण या घडीला तसा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही.
- माजी आमदार महादेवराव महाडिक
सत्तारूढ गटाचे नेते
तीन पर्याय असे असतील
नेते व संचालक यांच्यात समतोल राखण्याचे काम विश्वास पाटील यांनी केले आहे. सर्वसाधारण सभेत विरोधकांना रोखण्यात त्यांना अपयश आले असले तरी आता बदल करायचा म्हटला तर सतेज पाटील यांना घाबरून बदल केल्याचा संदेश जाईल. म्हणून विश्वास पाटील यांनाच कायम ठेवण्याची शक्यता आहे.
सर्व मतभेद बाजूला ठेवून ‘अमूल’च्या संकटाचा सामना करण्यासाठी अरुण नरके यांचाही विचार होऊ शकतो; पण त्यांनी उघड घेतलेली भूमिका संचालकांसह नेत्यांना कितपत पचनी पडणार? हे महत्त्वाचे आहे.
सर्वसाधारण सभा व्यवस्थित हाताळू शकले नाहीत म्हणून विश्वास पाटील यांना बदलायचे झाल्यास सहमतीचे नाव म्हणून रवींद्र आपटे यांचे नाव पुढे येऊ शकते.