शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरात व मनामनात रुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:09+5:302021-07-15T04:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवसंपर्क अभियान हे शिवसेना प्रत्येक घराघरात व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवसंपर्क अभियान हे शिवसेना प्रत्येक घराघरात व मनामनात रुजविण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी असून, शिवसैनिकांनी संकटाच्या काळात प्रत्येक घराघरात जाऊन जनतेच्या अडचणी सोडवत पक्षासाठी काम करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले.
ते गारगोटी येथील आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित शिवसंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, तळागळातील आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी सदैव शिवसेना उभी राहिली आहे. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरुन शिवसेनेने अनेक आंदोलने केली आहेत. कोरोना काळातही शिवसेना आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहे. महाराष्ट्राची वाटचाल शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे सुरु असून, आगामी काळातही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वाने काम करुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेला भक्कम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असा संकल्प यावेळी त्यांनी केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, अशोकराव भांदीगरे, शिवाजीराव ढेंगे, सभापती आक्काताई नलवडे, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, प्रवीण नलवडे, बाजीराव चव्हाण, सदाशिव खेगडे, मिलिंद पांगीरेकर, राजेंद्र चिले, दीपक मोरे, अजित चौगले उपस्थित होते.
फोटो ओळ - गारगोटी येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमात विजय देवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, प्रकाश पाटील, आक्काताई नलवडे, बाबा नांदेकर, अशोक भांदीगरे, अविनाश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.