सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शाहू’विचार सर्वतोपरी पोहोचवा
By admin | Published: June 26, 2015 12:59 AM2015-06-26T00:59:26+5:302015-06-26T00:59:26+5:30
धनंजय महाडिक : राजर्षी शाहू अँड्रॉईड अॅप्लिकेशनचे उद्घाटन
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या उत्तुंग सामाजिक कार्याची ओळख आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. राजर्षी शाहंूचा विचार जगभर पोहोचविण्याच्या हेतूने राकेश व रफी या दोघांनी अँड्रॉईड अॅप्लिकेशन तयार केले आहे. युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहूंचा विचार सर्वतोपरी पोहोचवावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरातील राकेश मधाळे व रफी मोकाशी या तरुणांनी 'राजर्षी शाहू अॅँड्रॉईड अॅप्लिकेशन' तयार केले आहे. त्याचा गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी खासदार महाडिक म्हणाले, सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजाळात डिजिटल तंत्रज्ञानास फार महत्त्व आले आहे. या तरुणांनी राजर्षी शाहूंच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी स्मार्टफोनच्या माध्यमाचा वापर केला आहे. त्यांचा हा विचार कौतुकास्पद आहे. राजर्षी शाहूंचा विचार सर्वतोपरी पोहोचविण्यासाठी ‘युवाशक्ती’च्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अॅप्लिकेशनबद्दल बोलताना राकेश मुधाळे म्हणाले, मी आणि रफी मोकाशी यांनी राजर्षी शाहू महाराजांचा विचार सर्वतोपरी पोहोचविण्यासाठी हे अॅँड्रॉईड अॅप्लिकेशन तयार केले आहे. अॅप्लिकेशन मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये आहे. यात राजर्षी शाहू महाराजांविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती आहे. तसेच दुर्मीळ अशी छायाचित्रेही यामध्ये आहेत. यात कोल्हापू्रच्या पर्यटनाचा तपशीलसुद्धा आहे. हे अॅप्लिकेशन आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पद्धतींनी कार्यरत राहू शकते.
याप्रसंगी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. पद्मा पाटील, प्राचार्य अजेय दळवी, पूनम दळवी, विजय टिपुगडे, फँटासॉफ्ट स्टुडिओचे रफी मोकाशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)