थरारली मने, सुन्न झाल्या दिशा... थिजले अश्रू अन् नि:शब्द भारतमाता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:48 PM2019-02-16T14:48:16+5:302019-02-16T14:49:26+5:30
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) रात्रीपासूनच सोशल मीडियावरील वातावरणही गंभीर बनले. एकीकडे या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तानविरोधातील तीव्र संताप सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत होता.
कोल्हापूर : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) रात्रीपासूनच सोशल मीडियावरील वातावरणही गंभीर बनले. एकीकडे या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तानविरोधातील तीव्र संताप सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत होता.
या भीषण हल्ल्याची सविस्तर माहिती गुरुवारी सायंकाळी मिळाल्यानंतर लगेचच अनेकांनी आपले डीपी बदलले. तसेच यापुढील २४ तासांमध्ये कोणतेही विनोद आणि अन्य पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन अॅडमिनकडून केले जात होते. त्याचे तंतोतंत पालन केले जात असल्याचेही दिसून आले. अनेक डीपींच्या माध्यमातून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश दिवसभर सुरूच होते.
केंद्र सरकारने कडक भूमिका स्वीकारावी, अशा अपेक्षाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या. ठिकठिकाणी जवानांना श्रद्धांजली वाहतानाचे फोटो टाकले जात होते. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतरच्या निर्णयाची माहितीही सोशल मीडियावरून फिरत होती.
या हल्ल्यातील जवानांचे मृतावस्थेतील फोटो शेअर करू नका, असे आवाहनही करण्यात येत होते. तसेच शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध सभा, पुतळा जाळण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे आवाहन करणारे संदेशही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आणि शुक्रवारी सकाळी सुरू होते.