बागल चौक संघाचा चिवट लेप्ट आऊट-
By Admin | Published: January 25, 2017 12:58 AM2017-01-25T00:58:53+5:302017-01-25T00:58:53+5:30
-रघुनाथ पाटील
फुटबॉल, हॉकी, क्रिकेट व अॅथलेटिक्समध्ये पारंगत असणाऱ्या रघुनाथ पाटील याने आपल्या कौशल्याने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. विद्यापीठाच्या या चारही संघांत त्याचा समावेश असे, अशी कामगिरी करणारे खेळाडू दुर्मीळच. ‘लेफ्ट आऊट’ या जागेला त्यानंी नवी ओळख दिली.
रघुनाथ नाना पाटील याचा जन्म कुर्डू, (ता. करवीर) येथे ८ जून १९४५ ला झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्याकाळी ही शाळा फुटबॉलकरिता विशेष प्रसिद्ध होती. ही शाळा खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देत असे. रघूला आपणही फुटबॉल खेळावे, असे वाटू लागले. पाटणकर शाळेत त्याला फुटबॉलचे दिग्गज खेळाडू डी. के. अतितकर व जयसिंंग खांडकेर यांचे विशेष मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. खांडेकर सर ‘लेप्ट आऊट’ या जागेवर खेळत होते. रघूनेही त्यांचा वारसा प्राप्त केला. रघू शालेय संघातून ‘लेप्ट आऊट’ या जागेवर उत्कृष्ट खेळू लागला. त्यावेळी होणारी
कै. दामू आण्णा मालवणकर शालेय फुटबॉल स्पर्धा रघूने आपल्या उत्कृष्ट खेळाने गाजविली.
फुटबॉलमधील उत्तम जाण, शरीर काटक व पिळदार. बॉल ड्रिबलिंग व बॉल टॅकलिंग चांगले. बॉल घेऊन विरुद्ध संघाच्या पेनल्टी एरियामध्ये तो कधी पोहोचला व कधी गोल झाला, हे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना समजतही नसे. रघूची साईट व्हॉली, लो ड्राईव्ह किकमध्ये प्रचंड ताकद व विजेची चपळाई होती. डाव्या बगलेतून उंचावरून बॉल विरुद्ध संघाच्या पेनल्टी एरियामध्ये फेकणे ही रघूची खासियत होय. याचा फायदा त्याच्या फॉरवर्डला मिळत असे.
या शाळेतून गोंविद जठार उत्तम ‘लेप्ट आऊट’ म्हणून बाहेर पडला. त्याच पावलावर पाऊल ठेवत एन. पी. हायस्कूलमधून रघू पाटीलचे रसायन तयार झाले. निजाम जमादार, सिंकदर सिकलगार हे रघूची वाटच पाहत होते. ते बागल चौक फुटबॉल संघाचे कुशल संघटक होते. त्यांनी रघू पाटील याला आपल्या संघात ‘लेप्ट आऊट’ या जागेवर स्थान दिले. त्या काळात प्रॅक्टिस, शिवाजी, बालगोपाल, महाकाली यांचा दबदबा होता. रघूने या संघांतून अनेक स्पर्धा गाजविल्या. यामुळे कोल्हापूरकर त्याला उच्च दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखू लागले. कुर्डूसारख्या लहान असणाऱ्या खेड्यातील रघू कोल्हापूरच्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याने सांगली, मिरज, गडहिंंग्लज, बेळगाव येथेही आपल्या ‘लेप्ट आऊट’ची चमक दाखविली.
रघूने खेळासह शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. जुनी ११ वी (एस.एस.सी.) पास झाल्यानंतर रघूने राजाराम कॉलेज या सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याची महाविद्यालयाच्या फुटबॉल संघात निवड झाली. त्याकाळी झोन, इंटर झोन सामने मोठ्या चुरशीने होत असत. यामध्ये रघूने आपल्या नेत्रदीपक खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीने रघूची पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी सलग तीन वर्षे निवड केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंतून ही निवड होत असे. रघूला जबलपूर (एम. पी.), इंदौर (एम. पी.) आणि मराठवाड्यातील औरंगाबाद येथे आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली.
रघू हा केवळ फुटबॉल खेळून थांबला नाही. तर हॉकी, क्रिकेट, अॅथलेटिक्समध्येही त्याचे योगदान मोठे आहे. शिवाजी विद्यापीठाच्या हॉकी संघात वेस्ट झोनकरिता रघू पाटील याची सलग तीन वेळा निवड झाली. सलग दोन वर्षे शिवाजी विद्यापीठाच्या हॉकी संघात कर्णधार म्हणून त्याने मान मिळविला. शिवाय शिवाजी विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स आणि क्रिकेट या संघांतही त्याचा समावेश असे. त्याने विविध खेळांतील अष्टपैलूत्व सिद्ध केले. कुर्डूतील ग्रामीण खेळाडूस लोक आता मोठ्या मनाने ओळखू लागले. त्याने शिक्षण आणि खेळ यात समांतर प्रगती केली. बी.ए.पास झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्याला बँकेच्या क्रिकेट टीमकरिता कायमची नोकरी मिळाली. रघू पाटील या बँकेतून असिस्टंट मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतरही रघूची खेळाची आवड व धार कमी झालेली नाही. शाहू स्टेडियमवरील स्पर्धा पाहण्यास तो न चुकता जातो. त्याच्या मते फुटबॉल खेळात आज प्रगती झाली आहे. मात्र, आजचे खेळाडू सरावात कमी पडतात.
(उद्याच्या अंकात : आनंदराव पाटील ऊर्फ आन्दुमा)