कोल्हापूर: जोतिबा डोंगरावर वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:48 PM2022-07-18T12:48:42+5:302022-07-18T12:49:14+5:30
जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर वाघाचे दर्शन
जोतिबा : जोतिबा डोंगराच्या पायथ्याला पट्टेरी वाघ पाहिल्याचा दावा काहीजणांनी केला. तसेच वाघाचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. पण फोटो स्पष्टपणे आला नाही. वाघाच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जोतिबा डोंगरच्या पायथ्याला असणाऱ्या धडसाचे खळे परीसरात गेल्या अनेक वर्षापासून वाघाच्या वास्तव्याची दगडी घळ आहे. काल, रविवारी सायंकाळी गावातील सुरज मिटके, सोमनाथ मिटके, संदिप भिवदर्णे यांनी वाघाला पाहिल्याचा दावा केला.
परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढले. या भागात बिबट्यांनंतर पट्टेरी वाघ आढळल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वतावरण निर्माण झाले आहे. येथे मोठी शेती असून परिसरात शेतकरी, जनावरे व भाविक पर्यटकांचा वावर असतो. जोतिबा मुख्य रस्ता बंद केल्याने गाय मुख वळण मार्गावरुन सद्या वाहतूक सुरू आहे. याच मार्गावर वाघाचे दर्शन झाले असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावुन वाघाला पकडुन सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.