चांदोली उद्यानातून वाघांची चोरटी शिकार!
By admin | Published: June 20, 2016 12:29 AM2016-06-20T00:29:41+5:302016-06-20T00:32:58+5:30
कातडी-नख्यांची तस्करी : प्रशासनाचा ढिसाळ कारभार, निसर्गप्रेमींकडून संताप
गंगाराम पाटील / वारणावती
चांदोली राष्ट्रीय उद्यानात गतवर्षी एका वाघाचे अस्तित्व असल्याचे आढळले होते. पण यावर्षीच्या गणनेत वाघांचे अस्तित्वच आढळून आलेले नाही. त्यामुळे चांदोली उद्यानामध्ये वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून, सांगलीतील वाघांची कातडी व नख्यांची तस्करी प्रकरणामुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सांगलीत पकडलेल्या तस्करांनीही चांदोलीत वाघांची चोरटी शिकार केल्याचे कबूल केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुखांनी माध्यमासमोर दिली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभार व अपुरे कर्मचारी व आवश्यक शस्त्रास्त्रे यांच्या कमतरतेमुळे उद्यानामध्ये वन्यप्राण्यांची चोरटी शिकार होत आहे. वाघांची चोरटी शिकार रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.
पश्चिम घाटातील सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील व सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य हे नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जंगल आहे. निमसदाहरित व दुर्गम डोंगराळ भागातील घनदाट जंगलामध्ये विविध प्रकारची जैवविविधता निर्माण झालेली आहे. यामध्ये २८ जातींचे सस्तन प्राणी, २७५ पक्ष्यांच्या प्रजाती, ४२ जातींचे उभयचर प्राणी, १२५ जातींची फुलपाखरे, ५८ सरपटणारे प्राणी आढळून येतात. निसर्गात राहणारा प्रत्येक जीव एकमेकावर अवलंबून असतो. याच जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचे अस्तित्व असल्याने केंदाने या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. पण लोकांच्या गैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांच्यात नाराजी दिसत असली, तरी वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघांची संख्या घटत आहे. राज्यातला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पासाठी कोयना अभयारण्याचे ४२३.५५ व चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७ चौरस कि. मी. क्षेत्राचा समावेश केलेला आहे.
पण या अभयारण्यामध्ये शिरण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातून उदगिरी, शित्तूर येथून, तर पाटण तालुक्यातून कचणी, काळगाव वाल्मिककडे जाणाऱ्या मार्गाने व शिराळा तालुक्यातून मिरुखेवाडी-जाधववाडी येथून आडमार्गाने शिकारी घुसून शिकार करतात. त्यामुळे जंगलातील वाघांचे अन्न कमी झाल्याने ते अन्नाच्या शोधात अभयारण्याबाहेर पडतात. असे वाघ, बिबटे तस्करांच्या विषप्रयोगाला बळी पडत आहेत.
काही लोक परराज्यातून येऊन वाघांना व बिबट्यांना कणकीच्या गोळ्यातून विष घालून, जाळे लावून त्यांची हत्या करतात व त्यांचे कातडे, पंजा व नख्यांची तस्करी करुन लाखो रुपये घेऊन पसार होतात. असे कित्येक वर्षे चाललेले आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही याची कुणकूण असते, पण त्यांच्या दुर्लक्षामुळे असे तस्करीचे प्रकार घडत आहेत. अभयारण्यात चोरट्या शिकारीमुळे वाघाचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय? असा सवाल निसर्गप्रेमींतून विचारला जात आहे. सांगलीतील पकडलेल्या वाघाचे कातडे, नख्या, पंजाच्या तस्करी प्रकरणामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील चोरट्या शिकारींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.