'चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये वाघाचा वावर, रेड्याची केली शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 11:36 AM2021-11-25T11:36:25+5:302021-11-25T11:50:43+5:30
यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच शिकार केल्याचे आढळून आले होते. आंबोली परिसरात वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्रही कैद झाले होते.
कोल्हापूर : 'चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे समोर आले आहे. या वाघाने रेड्याची शिकार केली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्यात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. रेड्याची शिकार करून वाघाने त्याचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. शिवाय त्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायाचे ठसेही आढळून आले. वन विभागाकडून यासंबंधी माहिती देण्यात आली.
चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'मध्ये अर्धवट खालेल्या स्थितीत एक मृत रेडा आढळून आला. त्याच्या मागील बाजूने वाघाने झडप मारून शिकार केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मृत रेड्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे या सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच शिकार केल्याचे आढळून आले होते. आंबोली परिसरात वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्रही कैद झाले होते.
राज्य सरकाराने 5 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह' आणि 22 हजार 523 हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. त्यापूर्वी 29.53 चौरस किमीच्या 'तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'ची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.