कर्तव्यदक्ष पोलिसांना घरातील गणपतीची आरती करण्याचं भाग्यच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 10:38 AM2019-09-02T10:38:42+5:302019-09-02T10:42:38+5:30
स्वत:च्या घरातील गणेशाची आरती करण्याचेही भाग्य मिळत नसल्याची खंत अनेक पोलिसांनी व्यक्त केली.
एकनाथ पाटील
कोल्हापूर - ऊन, वारा, पाऊस यांसह कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देताना त्यांचं दुखणं कोणी जाणून घेत नाही. वेळेवर जेवण नाही की झोप नाही. स्वास्थ्य बिघडले असले, तरी सांगायचे कोणाला, अशा गंभीर अवस्थेत ऐन गणेशोत्सवात रस्त्यावर चोवीस तास पोलीस कर्तव्य सेवा बजावीत आहेत. त्यांच्यामुळेच प्रत्येक नागरिक सणासुदीचा आनंद घेताना दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करीत आहेत. स्वत:च्या घरातील गणेशाची आरती करण्याचेही भाग्य मिळत नसल्याची खंत अनेक पोलिसांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घराघरांत श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. प्रशासनामध्ये प्रत्येक सणाला वंचित राहणारा एकच घटक आहे, तो म्हणजे पोलीस. यांच्या सुख दु:खाकडे कोणीच लक्ष देत नाही. तेसुद्धा आपली व्यथा कोणाजवळ बोलून दाखवीत नाहीत. गणेशोत्सवामध्ये घरी गणेशाची प्रतिष्ठापणा करण्याचे किंवा आरती करण्याचे भाग्य अनेक पोलिसांना मिळत नाही. रस्त्यावर चोवीस तास बंदोबस्तात व्यस्त असल्याने सण किंवा उत्सव ही संकल्पनाच पोलिसांच्या जीवनातून कालबाह्य झाली आहे. गणेशोत्सवच काय; दिवाळीसह ईद, नाताळ, नववर्षासह संक्रांतीलाही घराकडे जाता येत नाही. बंदोबस्तामुळे आई-वडिलांसह पत्नी, मुलांचे स्वास्थ्य हरविले आहे. अंघोळ नाही, नाष्ट्यासह जेवणाचा तर पत्ताच नाही. अशावेळी प्रसंगी वडापाव खाऊन दिवस काढावे लागत आहेत. त्यांच्या दु:खाची कोणालाच झळ पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. गणेशोत्सवात शहरात एक हजार पोलीस चोवीस तास बंदोबस्तासाठी रस्त्यावर सतर्कपणे सेवा बजावत आहेत.
साडीची हौसही पूर्ण करता येत नाही
आदल्या दिवशी हरतालिकाचा उपवास असतो. ड्यूटीमुळे तो महिला कॉन्स्टेबलना करता येत नाही. सजावट नाही, मुलांकडे लक्ष देता येत नाही. खीर, मोदक बनविण्याचे भाग्यही अनेक महिला पोलिसांना मिळत नाही. वर्षभर अंगावर खाकी असते. सणामध्ये अंगावर साडी घालण्याची हौसही त्यांना पूर्ण करता येत नाही. गौरी आणायला जाणे तर सोडा; रात्रीच्या वेळी दारा-घरासमोर खेळणाऱ्या महिलांमध्ये सहभागी होऊन आनंद लुटण्याची संधीही मिळत नाही. शासकीय प्रशासनातील एकमेव पोलीस वर्ग सणासुदीचा आनंद, उत्साहापासून वंचित राहत आहे.
वाहतूक पोलिसांची घालमेल
गणेशोत्सवात शहरात वाहने आणि लोकांचे लोंढे सांभाळताना तसेच वाहतुकीचे नियोजन करताना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची घालमेल होत आहे. सकाळी नऊ ते रात्री रस्त्यावरील नागरिकांची गर्दी संपेपर्यंत त्यांना वाहतुकीचे नियोजन करावे लागते. रस्त्यावर उभे राहून चौकात इकडे-तिकडे फिरत, शिट्टी वाजवीत, हातवारे करीत राहिल्याने संपूर्ण अंग थकले जाते. पायांत गोळे आले तरी निमूटपणे सहन करीत ते कर्तव्य बजावत आहेत.