टिक्केवाडी ग्रामस्थांचा जंगलात मुक्काम : घरदार उघडे सोडून गावाबाहेर वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:02 AM2018-02-22T01:02:44+5:302018-02-22T01:03:18+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे टिक्केवाडी गाव आहे.
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे टिक्केवाडी गाव आहे. या गावातील ग्रामस्थ दर तीन वर्षांनी गूळ काढण्याच्या प्रथेप्रमाणे घरदार सताड उघडे सोडून गावाबाहेर जंगलात राहण्यासाठी जातात. या कालावधीत गावात एकही माणूस नसतो की, गोठ्यात एकही जनावर नसते. कोणत्याच घरात चूल पेटलेली नाही की दिवा पेटलेला नाही, ही आहे टिक्केवाडी गावची प्रथा. हा संपूर्ण गावच गेलाय ग्रामदैवत भुजाईदेवीच्या श्रद्धेपोटी जंगलात राहायला.
गावकºयांच्या भाषेत ‘गुळं काढायला’ अनेक वर्षे गुळं काढण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जोपासली जात आहे. सुशिक्षितांचे गाव अशी वेगळी ख्याती असलेल्या या गावाने धार्मिक प्रथा तितक्याच श्रद्धेने जोपासली आहे; पण पिढ्यान्पिढ्या या गावात ‘गुळं काढणं’ ही प्रथा चालत आली आहे. दर तीन वर्षांनी देवीच्या श्रद्धेपोटी ही प्रथा चालत आली आहे. परंपरेप्रमाणे गावातील सर्वच लहान-थोर गुरांसह घरदार उघडे सोडून जंगलाच्या सान्निध्यात राहावयास गेले आहेत. देवीच्या कृपेने गावात चोरी होत नाही. चोरीची इतिहासात नोंदही नाही, असे गावकºयांचे मत आहे. ग्रामस्थ ही प्राचीन परंपरा देवीच्या प्रेमापोटी जोपासत आहेत.
गुळं काढण्यापूर्वी ग्रामदैवत भुजाईला कौल लावला जातो. गाव सोडून गावच्या वेशीबाहेर राहायला जावे लागते. देवीने परवानगी दिल्यानंतर सर्व गाव घरात प्रवेश करतो. संसार व घरदार सोडून ग्रामस्थ वेशीबाहेर राहतात. शिवारात पालं, मांडव उभारून संसार थाटतात. निसर्गाच्या सान्निध्यात लहान-थोर जीवन व्यतित करतात. निसर्गात ते वनभोजनाचा आनंद घेतात. काहीजण स्वतंत्र तर काहीजण २० ते २५ कुटुंबे एकत्र येऊन एकच मांडव उभारून राहतात. गावातील स्त्रिया ग्रामीण गीतांमध्ये रंगून जातात. गौरी गीते, जात्यावरच्या ओव्या, रुखवत, उखाणे या ग्रामीण कार्यक्रमांचा रंग भरतो, तर पुरुष मंडळी भजनात रंगून जातात. तर तरुण बुद्धिबळ, कॅरम, मराठी, हिंदी गाण्यांच्या मैफलीत रंगतात. सारा गाव भुजाईदेवीच्या श्रद्धेने बहरून जातो. तालुक्यात सुशिक्षितांचा गाव अशी ओळख असताना गावाने प्रथेचा श्रद्धेने स्वीकार केला आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या प्रथेतून त्यांचे भुजाईदेवीवरील प्रेम या निमित्ताने पाहावयास मिळते.
गुळं काढण्याच्या या प्रथेप्रमाणे जोपर्यंत भुजाईचा कौल होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांना गाव सोडून राहावे लागते. मागच्यावेळी सुमारे दीड महिना कौल मिळाला नसल्यामुळे जंगलात राहावे लागले होते. याचा निश्चित असा कालावधी कोणीही सांगू शकत नाही; पण विरक्त जीवन जगण्याची अनुभूती देणारा एक वेगळा अनुभव दर तीन वर्षांनी घेता येतो. काही लोक अंधश्रद्धा म्हणत असले तरीही जीवनाचा वेगळा अनुभव देणारी ही प्रथा भाविक मनोभावे पाळतात.
- नेताजी गुरव, पोलीस पाटील