टिंबर मार्केट भाजी विक्रेत्यांचा मोर्चा
By Admin | Published: March 14, 2016 11:41 PM2016-03-14T23:41:13+5:302016-03-14T23:41:13+5:30
पुनर्वसनाचा प्रश्न : महापालिकेसमोर आयुक्तांची गाडी अडवून निदर्शने
कोल्हापूर : डोक्यावर भाजीची बुट्टी घेऊन टिंबर मार्केटमधील भाजी विक्रेत्या महिलांनी सोमवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने केली. परिसरातील भाजी विक्रेत्यांचे वारंवार पुनर्वसन होऊनही पुन्हा त्यांचे पुनर्वसनाच्या नावाखाली हटविण्याचा महापालिका प्रशासनाचा डाव मोडून काढण्यासाठी या भाजी विक्रेत्यांनी हा मोर्चा काढून आयुक्त पी. शिवशंकर यांची महापाालिका प्रवेशद्वारातच गाडी अडविली. या आंदोलनाचे नेतृत्व मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी केले.
संभाजीनगर परिसरातील भाजी विक्रेते हे टिंबर मार्केट परिसरात व्यवसाय करतात. हा व्यवसाय प्रथम स्वामी समर्थ मंदिर ते रेसकोर्स नाका या परिसरात सुरू होता. वाहतूक अडथळ्याचे कारण पुढे करत महापालिकेने त्यांना तेथून निर्माण चौक ते पेट्रोल पंपापर्यंत व्यवसायास भाग पाडले. पुन्हा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्यांचे पुनर्वसन टिंबर मार्केट परिसरात कायमस्वरूपी पट्टे मारून केले. गेली १५ वर्षे येथे हे भाजी विक्रेते येथे सुरळीत व्यवसाय करत आहेत. पुन्हा उद्योगपती, प्रशासन व लोकप्रतिनिधींचा संगनमताने या भाजी विक्रेत्यांना येथून हटविण्याचा डाव सुरू आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ‘मनसे’च्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाकडे दाद मागितली.
शिवाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. भाजी विक्रेत्या महिला डोक्यावर भाजीच्या बुट्ट्या घेऊन आल्या होत्या. मोर्चा महापालिकेवर पोहोचल्यावर प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांची गाडी महापालिकेत जात असताना या भाजी विक्रेत्यांनी त्यांची गाडी काही वेळ अडवून धिक्कार केला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.
मोर्चात जिल्हाध्यक्ष राजू जाधव, बबन सावरे, नरेश चिक्कोडीकर, आण्णा तिळवे, सागर वासुदेव, भीमराव साखरे, विजय वाडकर, रशीद बागवान, अंजना चव्हाण, सिंधू कांबळे, रंजना खाडे, किरण पोतदार, सुरैया बागवान, बाळासाहेब यादव, अजय चौगुले, सतीश सावंत, योगेश कवाळे, प्रकाश तौर, बापू चव्हाण, मोहसीन बागवान,भाजी विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उन्हातही महिलांची लक्षणीय उपस्थिती
रणरणत्या उन्हात भरदुपारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजी विक्रेते महिलांची संख्या मोठी होती, तर डोक्यावर भाजीच्या बुट्ट्या घेऊन अनेक वृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. कडक उन्हामुळे या मोर्चातील वृद्ध महिलांसह आंदोलकांची केविलवाणी परिस्थिती झाली होती.