गैरव्यवस्थापनामुळेच कारखाने लिलावात काढण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:59+5:302021-03-04T04:46:59+5:30
कोल्हापूर : कार्यक्षेत्रामधून पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याची फारशी फिकीर न करता उभारणी केलेले कारखाने व त्यातही ...
कोल्हापूर : कार्यक्षेत्रामधून पुरेसा ऊस उपलब्ध होईल की नाही याची फारशी फिकीर न करता उभारणी केलेले कारखाने व त्यातही पुन्हा गैरव्यवस्थापन यांमुळेच तोटा होत जाऊन आता राज्यातील पाच कारखान्यांचा लिलाव करण्याची पाळी आली आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे सहकारी चळवळीचे आगर मानले जात होते. आता त्याच महाराष्ट्रात सहकारातील कारखान्यांची लिलावात विक्री होऊ लागली आहे आणि खासगी कारखान्यांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात सध्या ९५ सहकारी व ९२ खासगी कारखाने सुरू आहेत. सहकारामध्ये तोट्यात गेलेला कारखाना खासगी मालकाने घेतला की तो मात्र उत्तम पद्धतीने चालत असल्याचीही राज्यात ‘जरंडेश्वर’पासून अनेक उदाहरणे आहेत.
विक्रीस काढलेले कारखाने व अन्य सहकारी संस्थाही घेणार कोण, हा कळीचा मुद्दा आहे. त्यातील बहुतांश कारखाने तर भंगारात वजनावर विकावे लागतील, अशा स्थितीत असण्याची शक्यता आहे; कारण साखर कारखानदारीतील तंत्रज्ञान आता अधिक विकसित झाले आहे. त्यामुळे जुन्या प्रकारच्या यंत्रसामग्रीवरील कारखाने घेऊन चालविणे म्हणजे ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी स्थिती आहे. मुळात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो. अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत. सरासरी अडीच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात किमान चार लाख टनांचे गाळप झाले तरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो; परंतु पुरेसा ऊस नाही म्हणून गाळप नाही, गाळप नाही म्हणून तोटे वाढतात, तोटे वाढले म्हणून ऊस बिले थकीत आणि बिलेच मिळणार नसतील तर शेतकरी ऊस घालत नाहीत, अशा चक्रव्यूहात अडकलेले हे कारखाने आहेत. यातील साहेबराव डोणगावकर यांचा गंगापूरसारखा कारखाना तर १९७२चा आहे. साधारणत: १९७२ ते १९९० च्या दरम्यानचे हे कारखाने आहेत. आता हे जुने कारखाने विकत घेऊन तिथे नव्याने चालवण्याचे धाडस कोण करील? तशी शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे ते भंगारात विकणे व मिळेल ती रक्कम कर्ज खात्याला जमा करून घेणे एवढ्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे.
शेतकरी वाऱ्यावर...
राज्य बँकेने त्यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या पाच कारखान्यांतील हजारो शेतकऱ्यांची ऊस बिले, ठेवी, सभासद भांडवलाचे कोट्यवधी रुपये व कामगारांचे पगारही थकीत आहेत. त्यांच्या पैशांचे काय, त्याला मात्र कोणीच वाली नाही, हे जास्त संतापजनक आहे. ज्याच्यासाठी उद्योग उभारला तो मरतानाही बिचाऱ्या शेतकऱ्याचेच पुन्हा मरण अशातील हा प्रकार आहे.