म्युकरमायकोसिसवर इंजेक्शन्स शोधण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:29+5:302021-05-20T04:27:29+5:30
कोल्हापूर कोरोनापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात याची ...
कोल्हापूर कोरोनापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात याची १० जणांना लागण झाली आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत येथील सीपीआरमध्ये दहा बेडचा स्वतंत्र उपचार कक्ष सुरू केला आहे. परंतु यावर आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनच्या किंमतीही भरमसाठ असून आता याबाबत प्रशासनानेही लक्ष घातले आहे.
एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असताना आणि मृतांच्या संख्येने धडकी भरत असताना दुसरीकडे म्युकरमायकाेसिसचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. हा बुरशीजन्य आजार असून तो नाकाच्या पाठीमागून सुरू होऊन नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. मधुमेही रुग्णांना त्याचा अधिक धोका असल्याने त्यानुसार उपचार करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
याआधी या आजाराचे येथील सीपीआरला वर्षातून दोन किंवा तीन रुग्ण आढळायचे त्यामुळे यावरील इंजेक्शन्सही औषध वितरक फारसे ठेवत नव्हते; मात्र आता याचीही मागणी सुरू झाली असून तशी मागणी नोंदवण्यात येत आहे. सध्या सीपीआर या शासनाच्या रुग्णालयात १५ वायल शिल्लक असून ५०० ची मागणी नोंदवण्यात आली आहे.
चौकट
तातडीने इंजेक्शन्स मिळण्यावर मर्यादा
या आजाराचे रुग्णच फारसे नसल्याने हे इंजेक्शन्स फारसे ठेवले जात नसल्याचे कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असाेसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. परंतु मोठया खासगी रुग्णालयांमध्ये अन्य आजारांसाठीही लिपोसोमल एम्फोटिसिरिन बी हे वापरले जात असल्याने ते उपलब्ध होते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये फारशी टंचाई नाही. परंतु सर्वत्रच ते तातडीने उपलब्ध होत नसल्याच्या मर्यादा आहेत.
चौकट
रुग्णाच्या स्थितीवर डोस अवलंबून
या आजारातील रुग्णाची नेमकी स्थिती कशी आहे यावर त्याला किती डोस इंजेक्शन द्यायचे हे ठरवण्यात येते. कमीत कमी १४ आणि जास्तीत जास्त ४० डोस लागू शकतात. सध्या २५० एमजीच्या पाच वायल १० हजार रुपयांना मिळत आहेत. कंपनीनुसार दीड हजार रुपयांपासून ते १० हजारांपर्यंत ही रक्कम जाते. त्यामुळे कमीत कमी दीड लाखापासून चार लाखांपर्यंत हा खर्च येतो. सध्या फारशी मागणी नसल्याने इंजेक्शन्सबाबत आग्रह धरला जात नाही; मात्र प्रशासनाने या इंजेक्शनच्या साठ्यावरही लक्ष ठेवले आहे.
कोट
रुग्णांमध्ये नाकावाटे शरीरात प्रवेश करणारी ही बुरशी प्रथम नाकाच्या मागच्या बाजूस वाढायला लागते. तेथे काळी खपली तयार होते. नाकातून ती सायनसमध्ये वाढते. तेथूनच शरीराच्या अन्य अवयवांमध्ये ती पसरत जाते. ही बुरशी नेत्रपटलावर पसरते त्यामुळे दृष्टी जाण्याचा धोका असतो. दात दुखणे, दात हलणे, गालाच्या वरच्या हाडाजवळ दुखणे अशीही लक्षणे दिसतात. ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे त्यांना याचा धोका जास्त संभवतो.
डॉ. अजित लोकरे
कान, नाक, घसा विभागप्रमुख. छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर