‘खोलखंडोबा’त उमेदवार शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:45+5:302021-01-02T04:20:45+5:30

विनोद सावंत/लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बारा बलुतेदार रहिवाशी असणारा खोलखंडोबा प्रभाग क्रमांक ३० अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित ...

Time to find a candidate in 'Kholkhandoba' | ‘खोलखंडोबा’त उमेदवार शोधण्याची वेळ

‘खोलखंडोबा’त उमेदवार शोधण्याची वेळ

Next

विनोद सावंत/लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बारा बलुतेदार रहिवाशी असणारा खोलखंडोबा प्रभाग क्रमांक ३० अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. एकीकडे शहरातील इतर प्रभागांत १० ते १५ उमेदवार इच्छुक असताना या प्रभागात मात्र, सध्याच्या घडीला केवळ तीन उमेदवारांची चर्चा आहे. विशेष म्हणजे याठिकाणी विद्यमान नगरसेवक असणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या गत निवडणुकीत खोलखंडोबा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित होता. ताराराणी आघाडीचे किरण शिराळे आणि शिवसेनेेचे अनिल पाटील यांच्यात प्रचंड चुरस झाली. केवळ ८५ मतांनी शिराळे विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग खुला होईल या आशेने १० ते १५ जणांनी कंबर कसली होती. मात्र, प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची निराशा पसरली आहे. किरण शिराळे, अनिल पाटील यांच्यासह ८ ते १० जणांचा पत्ता कट झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर राहत असणारा हा प्रभाग आहे. त्यांच्यासाठी येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. गत निवडणुकीत शिवसेनेला कमी मताने पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांनी आतापासून प्रभागावर लक्ष केंद्रीत केले आहे.

सध्याच्या घडीला येथून लता कदम, आशा सोनवले आणि ज्योती हंकारे या तीन उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे. लता कदम यांच्या कुटुंबीयाने यापूर्वी महापालिकेत तीनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये १९९० मध्ये प्रकाश कदम, २००५ मध्ये स्वत: लता कदम आणि २०१० मध्ये महेश कदम यांनी महापालिकेचे सभागृह गाजवले. यापूर्वी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लता कदम पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. जयवंत सोनवले गेल्या ४२ वर्षांपासून समाजकार्यात असून त्यांनी पत्नी आशा सोनवले यांना रिंगणात उतरविले आहे. नीलेश हंकारे हे गेल्या १२ वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून समाजिक काम करत आहेत. त्यांनी पत्नी ज्योती हंकारे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

चौकट

उमेदवार तीन आणि पक्ष पाच ते सहा अशी स्थिती झाली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चढाओढ आहे. हंकारे तर शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचा प्रभागात दावा करत असून क्षीरसागर यांच्यासोबतचे फलकही लावले आहेत. गेल्या पाच वर्षांत या प्रभागात नगरसेवक असणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीचा प्रभाग आरक्षित झाल्याचा फटका बसला असून त्यांच्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

गत निवडणुकीतील चित्र

किरण शिराळे (ताराराणी आघाडी) १९१४

अनिल पाटील (शिवसेना) १८२९

श्रीकांत बनछोडे (काँग्रेस) ७२७

राहुल काकडे (राष्ट्रवादी) ११२

प्रतिक्रिया

पाच वर्षांत १ कोटी ४० लाखांचा निधी खेचून आणला. गटारी, ड्रेनेज लाईन, डांबरीकरणाची कामे केली. त्यामध्ये पंचगंगा हॉस्पिटलसाठी ४० लाख तर खोलखंडोबा सांस्कृतिक हॉलअंतर्गत कामांसाठी १० लाखांचा समावेश आहे. प्रभागात एलईडी दिवे बसविले आहेत. पद्माराजे विद्यालय परिसरातील कोंडाळा वगळता इतर प्रभाग कोंडाळामुक्त केला आहे. विरोधी पक्षनेतेपद असताना शहरातील अनेक समस्या सभागृहात मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला.

किरण शिराळे, विद्यमान नगरसेवक

प्रभागातील समस्या

पद्माराजे विद्यालयाची दुरावस्था

बुरुड गल्ली कमान ते भगतसिंग तरुण मंडळ रस्त्याची चाळण

पद्माराजे विद्यालयाच्या मैदानावर खासगी पार्किंगचे अतिक्रमण

म्हसोबा गल्ली ते क्षीरसागर रस्त्याची दयनीय अवस्था

वेल्हाळ बाग परिसरात खड्ड्याचे साम्राज्य

पद्माराजे विद्यालयाच्या मैदानातील कोंडाळ्यातील कचरा उठाव वेळेवर होत नाही.

महापालिका मालकीच्या खोलखंडोबा सांस्कृतिक हॉलची डागडुजी आणि विस्तारीकरणाकडे दुर्लक्ष

पाण्याची समस्या वाढली, टँकरही मिळत नाहीत.

फोटो : ०१०१२०२० कोल खोलखंडोबा प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील बुरुड गल्ली कमान ते भगतसिंग तरुण मंडळ या मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून वाहनधारकांसोबत नागरिकांना कसरत करूनच ये-जा करावी लागत आहे.

Web Title: Time to find a candidate in 'Kholkhandoba'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.