टाईम, टिफिन आणि तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:52 AM2019-01-01T00:52:14+5:302019-01-01T00:52:18+5:30
समीर देशपांडे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक हा एका पिढीचा पाया घालत असतो. तो जितका स्वत: समृद्ध ...
समीर देशपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक हा एका पिढीचा पाया घालत असतो. तो जितका स्वत: समृद्ध असेल, तितकाच त्याचा विद्यार्थी अधिक समृद्ध होण्याची शक्यता वृद्धिंगत होते. म्हणून केवळ शासकीय प्रशिक्षणांना उपस्थिती न लावता, तो वैयक्तिक पातळीवर आणि प्रयत्नांमधून अधिक प्रयोगशील, प्रगल्भ व्हावा, या हेतूने गेली पाच वर्षे ‘टाईम, टिफिन आणि तिकीट’ हा उपक्रम राबविला जात आहे.
निवृत्त सहा. शिक्षण संचालक संपत गायकवाड आणि सध्याचे करवीर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी भुदरगड पंचायत समितीकडे कार्यरत असताना त्यांच्या डोक्यामध्ये ही विधायक संकल्पना आली. केवळ चांगली संकल्पना आहे म्हणून शांत न राहता त्यांनी ती राबविण्याचा निर्णय घेतला.
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी हा पालकांबरोबरच शिक्षकांच्या सहवासात अधिक असतो. या शाळेमध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडण्यास सुरुवात होते. एकीकडे प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन प्रयोग होत असताना, त्याची अनेक प्रशिक्षणे सुरू असताना शिक्षकाने स्वत:हून आपण समृद्ध होण्यासाठीच जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, हा या उपक्रमामागील हेतू आहे.
शासकीय प्रशिक्षणांसाठी ‘आॅन ड्युटी’ जाता येते. तेथे जेवणाची सोय असते. गरज असेल तर येण्या-जाण्याचा खर्चही शासन करते. मात्र, या उपक्रमामध्ये ‘थ्री टी’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. शिक्षकांनी आपला स्वत:चा वेळ द्यावा ‘टाईम’, स्वत:चे जेवण आणावे ‘टिफिन’ आणि स्वत:च्या खर्चाने प्रवास करून या शिबिरास्थळी यावे ‘तिकीट’, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
पहिले शिबिर भुदरगड तालुक्यातील मठ येथे २0१४ साली घेण्यात आले. यानंतर कोल्हापूर शहरामध्ये दुसरे, तर सांगरूळ येथील जोतिर्लिंग मंदिरामध्ये तिसरे शिबिर घेण्यात आले. आता चौथे शिबिर ५ जानेवारीला करवीर तालुक्यातील गणेशवाडीजवळील सातेरी महादेव येथे घेण्यात येणार आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यापासून ते इंद्रजित देशमुख यांच्यापर्यंतच्या मान्यवरांनी या शिबिरांमध्ये शिक्षकांशी संवाद साधला आहे. हा उपक्रम इतका अनौपचारिक ठेवण्यात आला आहे, की भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, शिक्षण विभागातील अधिकारीही या शिबिराला आवर्जुन भेट देतात.