माळरानावरील झाडांना 'टाईम टू टाईम' पाणी
By admin | Published: November 16, 2015 12:28 AM2015-11-16T00:28:06+5:302015-11-16T00:28:51+5:30
कल्पक प्रयोग : शिवाजी विद्यापीठात अॅटोमेटिक प्लँट वॉटरिंग सिस्टीम विकसित
संतोष मिठारी -- कोल्हापूर --माळरानातील विविध फळबागा, झाडांना पाणी देताना बहुतांश वाया जाते. त्यातून पाण्याचा अपव्ययसोबत ते झाडांच्या वाढीला मारक ठरते. मात्र, आता फळबागा, झाडांना आवश्यक तितक्या प्रमाणात पाणी देण्याची काळजी मिटणार आहे. कारण शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील विशाल पाटील व पूजा उचगांवकर या संशोधकांनी पाणीपुरवठ्यासाठी अॅटोमेटिक प्लँट वॉटरिंग सिस्टीम विकसित केली आहे. अवघ्या तीनशे रुपयांत संबंधित यंत्रणा कार्यान्वित करता येते.
राज्यात विविध ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागासह खासगी फळबागा आहेत. यातील बहुतांश फळबागा माळरानात आहेत. या ठिकाणी बहुतांश टँकरद्वारे पाणी घातले जाते. मात्र, यात पाणी वाया जाते. शास्त्रीयदृष्ट्या पहाटे झाडांना पाणी देणे उपयुक्त ठरणारे असते. मात्र, माळरानातील या झाडांना या वेळेत पाणी कुणी द्यायचे, याचा प्रश्न असतो. यावर विशाल पाटील आणि पूजा उचगांवकर यांनी उत्तर शोधले आहे. त्यांनी मायक्रो कंट्रोलर, तीन व्होल्टचा सबमर्सिबल पंप, दोन सेल आणि प्लास्टिकचा कॅन यांचा वापर करून तीनशे ते चारशे रुपयांत संबंधित यंत्रणा साकारली आहे. यंत्रणेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीमवर भर दिला आहे. घड्याळाप्रमाणे संबंधित यंत्रणा काम करते. त्यामुळे एका झाडाला आवश्यक ते प्रमाण आणि वेळ निश्चित केल्यास त्यानुसार पाणीपुरवठा होतो. संबंधित यंत्रणा दुष्काळी भागात उपयोगी ठरणारी असून, पाणी बचत होणार आहे.
शासनाला सादर करण्याची तयारी
अॅटोमेटिक प्लॅट वॉटरिंग प्रणालीत काही किरकोळ स्वरूपात बदल करून ते शासनाला सादर करण्याची आमची तयारी आहे. स्वत:च्या शेतीतील परिस्थितीतून ही कल्पना सुचल्याचे विशाल पाटील याने सांगितले. यासाठी संगणकशास्त्र विभागप्रमुख व पीएच.डी.चे मार्गदर्शक प्रा. डॉ. आर. के. कामत यांचे पाठबळ मिळाले. कमी खर्चातील ही यंत्रणा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे.