Kolhapur: भाजपवर मंत्री हसन मुश्रीफांना विनंती करण्याची वेळ, बदलत्या राजकारणाचा परिणाम
By समीर देशपांडे | Published: October 16, 2023 12:35 PM2023-10-16T12:35:18+5:302023-10-16T12:36:04+5:30
मुश्रीफ यांनीही हातात हात घालून काम करण्याची ग्वाही दिली
कोल्हापूर : ज्या हसन मुश्रीफ यांच्याशी भाजपचा उभा दावा होता त्याच मुश्रीफ यांना भेटून आम्हांला विश्वासात घेवून निधी वाटप करा अशी विनंती करण्याची वेळ भाजपच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, प्रदेशक कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे यांनी रविवारी मुश्रीफ यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मुश्रीफ ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यासाठी ते नेहमी पत्रकार परिषदाही घ्यायचे. परंतू ईडीच्या धाडीनंतर या पत्रकार परिषदा बंद झाल्या. आता तर महायुतीत सहभागी झाल्याने अमित शहा यांना कोल्हापूरात जिल्हा बॅंकेच्या विस्तारित कक्षाच्या उद्घघाटन कक्षाला आणणार असल्याचे रोज सांगत आहेत.
मुश्रीफ आणि भाजपचे त्यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे हे अजूनही समोर शड्डू ठोकून उभे असताना भाजपच्या या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. निधी वाटपामध्ये आणि समित्या नियुक्त करताना महानगर जिल्हाध्यक्षांच्या पत्रानुसार कार्यवाही करावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली असून मुश्रीफ यांनीही हातात हात घालून काम करण्याची ग्वाही दिली आहे. बदलत्या राजकारणाचा हा महिमा हे निश्चित.