आंतरराष्ट्रीय जलदिवस विशेष: कोल्हापूर जिल्ह्यातील जलसमृद्ध जलसंपत्ती वाचवण्याची आली वेळ
By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2025 15:37 IST2025-03-22T15:36:48+5:302025-03-22T15:37:10+5:30
पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच न थांबवल्यास अन्यथा भीषण परिस्थिती

आंतरराष्ट्रीय जलदिवस विशेष: कोल्हापूर जिल्ह्यातील जलसमृद्ध जलसंपत्ती वाचवण्याची आली वेळ
संदीप आडनाईक
कोल्हापूर : गरज भागवण्याइतपत पुरेसे पाणी दरवर्षी पावसाच्या रूपाने मिळत असूनही जलसमृद्ध असलेल्या जिल्ह्यातील काही शहरे आणि गावांना दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच थांबवून त्याच्या जलव्यवस्थापनाची आदर्श साेय वेळीच न लावल्यास भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जिल्हा असलेला कोल्हापूर सह्याद्री पर्वतरांगेचाच म्हणजेच पश्चिम घाटाचा एक भाग आहे. हा असा जिल्हा आहे की, यातील एकूण एक तालुक्यातून एक किंवा दाेन नद्या वाहतात. त्यामुळे हा जिल्हा जलसमृद्ध आहे. या जिल्ह्यात दुष्काळ अभावानेच पडताे; परंतु तरीही जेथे मुबलक पाणी आहे आणि जेथे दुर्भिक्ष आहे, अशा गावांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते; पण शास्त्रीय उपाय योजले तर ही जलसंपत्ती वाचू शकते, असे मत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे व्यक्त केले आहे.
पाण्याची वस्तुस्थिती
- ७,७४९ चाैरस किलोमीटर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ
- १९७१.१२ मिलिमीटर : जिल्ह्यात पडणारा सरासरी पाऊस
- ५५० टीएमसी : दरवर्षी पावसापासून मिळणारे पाणी
- ४५-५० टक्के पाणी जीवबाष्पीभवनाने पुन्हा माघारी वातावरणात फेकले जाते.
- ४-१० टक्के पाणी जमिनीत मुरते, भूजल पुनर्भरणासाठी उपयाेगी
- ४०-४५ टक्के पावसाचे एकूण पाणी भूपृष्ठावरून, नदी-नाल्यातून वाहून जाते.
- २२० टीएमसी पाणी खर्चासाठी, पिण्यासाठी, उद्याेगासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध
- १२५ टीएमसी पाणी लहान-माेठी धरणे, तलाव, शेततळी, नदीतील डाेह यांतून साठवले जाते.
वर्ष सरासरी पाऊस
२०२० - १४०५
२०२१ - १४७७
२०२२ - १३४२
२०२३ - ९८७
२०२४ - १४८३
यामुळे पडतोय जलसंपत्तीवर घाला
जमिनीवरचा झाड-झाडाेरा घटत चालल्याने मृदेतील आर्द्रताही कमी हाेत आहे.
जमीन पडीक बनत आहे, उत्पादन क्षमता खूपच घटत आहे.
पाण्याचे साठे माेठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने, ते वापरास निरुपयाेगी बनत आहेत.
अनेक गावे आणि शहरातील भागाना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
हे आहेत उपाय
- शास्त्रीय पद्धतीने जलवितरण हवे
- जलव्यवस्थापन यंत्रणांनी जलसाठे संरक्षित ठेवावेत
- हे जलसाठी प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- जलसाठ्यांवर जनावरे, वाहने, कपडे धुण्यासाठी बंदी घालणे
- कारखान्याचे पाणी जलसाठ्यात मिसळू न देणे
- अपुऱ्या आणि कुचकामी जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करणे