नेत्यांच्या उमेदवारांना ‘टिप्स’
By admin | Published: October 6, 2015 12:56 AM2015-10-06T00:56:10+5:302015-10-06T00:58:03+5:30
भाजप-ताराराणी आघाडी : उमेदवारी डावलल्याने चावरे, बसुगडे, खोतही अन्य पक्षांच्या संपर्कात
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना महायुतीच्या नेत्यांकडून सोमवारी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे महायुतीच्या उमेदवारांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रमुख उपस्थिती आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींची होती.
यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने कसा भरायचा याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत, आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांसमोर आत्मविश्वासाने सामोरे जावे. आपल्या पक्षाचा अजेंडा व आपण काय करणार याची माहिती मतदारांशी संवाद साधताना द्यावी, असे मार्गदर्शन यावेळी नेत्यांकडून करण्यात आले. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीला उमेदवारांची गर्दी दिसत होती.
दरम्यान, ताराराणी-भाजप महायुतीच्या गोटात बऱ्याच हालचाली झाल्या. यापूर्वी ७९ उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित दोन उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर होतील, अशी शक्यता होती परंतु त्याबाबत घोषणा होऊ शकली नाही. आज, मंगळवारी हनुमान तलाव व लक्ष्मी-विलास पॅलेस या कसबा बावड्यातील दोन प्रभागांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.
दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून भाजप-ताराराणीची उमेदवारी जाहीर झालेले हेमंत कांदेकर यांना थांबवून प्रतापसिंह जाधव यांना उमेदवारी देण्याविषयी हालचाली झाल्याचे समजते. या वृत्ताचा कांदेकर यांनी इन्कार केला आहे तसेच भाजप-ताराराणी आघाडीकडून रंकाळा स्टॅँडमधून उमेदवारी डावलेले माजी नगरसेवक संभाजी बसुगडे हे दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून अन्य पक्षातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. राजलक्ष्मीनगर प्रभागातून उमेदवारी डावलेले वर्षा रमेश चावरे व शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागामधून डावलेले शालन शामराव खोत हेसुद्धा अन्य पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
रमेश पुरेकर राष्ट्रवादीच्या संपर्कात
साईक्स एक्स्टेंशन प्रभागातून ताराराणी आघाडीकडून उमेदवारी डावलल्याने माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याची चर्चा होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते तसेच ताराराणी आघाडीकडून डावलेले दुसरे उमेदवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुतणे अनिरुद्ध पाटील यांच्या उमेदवारीसंदर्भात फेरविचार करण्याबाबतही आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते येथून ताराराणी आघाडीकडून कुलदीप देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक आहेत.