चिमुकल्यांनी शिकवले वाहतुकीचे नियम आता तरी येईल का मोठ्यांना शहाणपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:27 PM2020-01-31T16:27:45+5:302020-01-31T16:36:12+5:30
कोल्हापूर_ : शहरातील दाभोळकर कॉनर आणि सीपीआर चौकात आज वाहनधारकांना चिमुकल्यांनी हातात विविध नियमांचे फलक धरून शिकवले आणि आपणही ...
कोल्हापूर_ : शहरातील दाभोळकर कॉनर आणि सीपीआर चौकात आज वाहनधारकांना चिमुकल्यांनी हातात विविध नियमांचे फलक धरून शिकवले आणि आपणही असे वागाल का अशी विनंती करीत त्यांच्यावर विश्वास ठेवला. नियम पाळाल तर प्रवास सुखकर होईल असेही काही चिमुकल्यांनी त्यांना समोर नव्हे तर अगदी जवळ जाऊन सांगितले. त्यामुळे या चिमुकल्यांनी दिलेली शिकवण हे मोठे लोक पाळतील का त्यापासून थोडे तरी शहाणपण घेतील का? असा विश्वास त्यांना नक्कीच त्यांच्या या उपक्रमातून वाटला असेल.
येथील कै. बी. डी. पाटील विद्यालय कळंबा (व्हाईट आर्मी स्कूल ) आणि संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या व्हाईट आर्मीचे सदस्य, विद्यालयाचे अस्मा अपराध यांच्या संयुक्त विद्यमानाने आज कोल्हापूर येथील मुख्य चौकात पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तोंडाला रुमाल बांधत, हातात वाहतुकीच्या विविध नियमांचे फलक घेऊन केलेला हा उपक्रम कौतुकास्पद व विशेष लक्ष्यवेधी ठरला. सहभागी झालेले विद्यार्थी शौर्य तापेकर, हर्षवर्धन शेंडे,सोहम शिंदे, वेदांत हारदे, अर्जून खानविलकर, नुतन धनाल, अनन्या पोवार, दुर्वा बुचडे, आफ्रिन शेख, अंकिता लोखंडे, अनुश्री शिंदे, जुवेरीया गारदी यांनी त्यांचे शिक्षक, व्हाईट आर्मीचे सदस्य व वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने सिंग्नला थांबल्यानंतर वाहनधारकांना थेट भिडून त्यांना हातातील फलक दाखविले. त्यांना काका, मामा अशी प्रेमळ हाक मारत, आपण वाहतुकीचे नियम पाळा, प्रवास सुरक्षित करा. सिंग्नल तोडू नका. आधी पादचाऱ्यांना रस्ता द्या. वेडीवाकडी वाहने हाकू नका. हेल्मेट वापरा. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका अशा सूचना केल्या.
यावेळी त्यांनी चौकात मध्यभागी वर्तुळाकार रिंगण करून हातातील फलक दाखवित चारीबाजूच्या वाहनचालाकांनाही वाहन चालविताना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले. काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तर थेट दुचाकी, चारचाकी वाहनचालकांच्या जवळ जाऊन त्यांचे समुपदेशनही केले.शिक्षक रामदास, कांबळे, हमिदा देसाई, व्हाईट आर्मीचे जवान प्रेम पवार, प्रेम सातपुते यांनी विशेष साथ देत, या चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांचेही मार्गदर्शन लाभले.
राबविण्यात आलेला वाहतुकीची शिस्त हा उपक्रम या चिमुकल्यांच्या कृतीतून विशेष लक्ष्यवेधी ठरला तसेच मोठ्यांना काहीसा शिकविण्याचा चांगला प्रयत्नही येथे झाल्याचे पहायला मिळत होते. वाढते अपघात, बेशिस्तीचा कहर यामुळे अपघात व वाहतूक विस्कळीत तर होतेच. पण अनेकांना गंभीर इजाही होते. त्यामुळे असे उपक्रम गरजेचे असून प्रत्येकांनी स्वयंमशिस्त पाळणे महत्वाची असल्याचे येथील वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले.