तुरंबे शेती कार्यालयाला टाळे
By admin | Published: February 3, 2015 12:10 AM2015-02-03T00:10:03+5:302015-02-03T00:27:35+5:30
‘बिद्री’च्या ऊसतोडीचा प्रश्न : राजकीय हेतूने अन्याय केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याच्या सेंटर आॅफिसला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. उसाचे क्षेत्र जास्त असूनही अपुरी वाहने, वेळेत ऊसतोड नाही, तुरंबे गावावर राजकीय हेतूने अन्याय केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकले.तुरंबे येथे बिद्री साखर कारखान्याचे शेती कार्यालय आहे. तुरंबे, कपिलेश्वर, मांगोली, मजरे कासारवाडा, आदी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हे कार्यालय सुरू आहे. मात्र, अन्य शेती आॅफिसकडील ऊसतोड पाहता या कार्यालयाचे कामकाज संथ आहे. तुरंबे गावचा प्रतिनिधीच संचालक मंडळात नसल्याने या गावाकडे राजकीय आकसाने पाहिले जात असल्याने अपुरी वाहने दिली जातात. ती सुद्धा वेळेत येत नाहीत. बदली वाहने यायला टाळाटाळ करतात, असा आरोप उपसरपंच विजय बलुगडे यांनी केला.ते म्हणाले, ३०० हेक्टर उसाचे क्षेत्र फक्त तुरंबे गावात आहे. मात्र, तुटलेल्या उसाचे प्रमाण विसंगत आहे. तुरंबे व कपिलेश्वर येथील प्रत्येकी ३१०० टन ऊसतोड झाली आहे, तर मांगोली येथील १२५० टन ऊस तुटला आहे. अजूनही ३० नोव्हेंबर अखेरचीच ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे शेती अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे येऊन खुलासा केल्याशिवाय टाळे काढणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने ऐन हंगामात कारखाना प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.यावेळी शामराव भावके म्हणाले, बिद्रीच्या कार्यक्षेत्रातील ऊस भोगावती कारखान्याकडे शेतकरी पाठवितात. त्यासाठी बिद्रीच्या संचालकांची चिठ्ठी घेतली जाते. हे अन्यायकारक आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.याबाबत तुरंबे सेंटरचे शेती मदतनीस बी. एस. चौगले यांच्याशी संपर्क साधला असता तुरंबे येथून बारा हजार मेट्रिक टन ऊसपुरवठा होतो. अद्याप नऊ हजार टन ऊस तुटायचा आहे. सध्या सहा बैलगाड्या आहेत; मात्र एकही ट्रॅक्टर नाही. त्यामुळे अधिक वाहने देण्याची मागणी कारखान्याकडे आहे. मात्र, कारखाना कमी अंतरावर असल्याने ट्रॅक्टरना थ्रु पास देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. बाळासाहेब भोईटे, रमेश सावंत, शिवाजी भोईटे, राजेंद्र देवर्डेकर, गोपाळ भोईटे, तानाजी घाटगे, बबन देवर्डेकर, आदी उपस्थित होते.