मुंबईच्या तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून गंडा
By admin | Published: March 9, 2016 01:29 AM2016-03-09T01:29:24+5:302016-03-09T01:30:39+5:30
लाखो रुपयांची फसवणूक: दोघांना आमिष दाखविणारा भामटा कोल्हापूर पोलिसांकडे
एकनाथ पाटील--कोल्हापूर -रंगाने गोरा, उंची साडेसहा फूट, धष्टपुष्ट शरीरयष्टी, डोळ्यावर रेबॅन गॉगल, अंगामध्ये किमती कपडे, हातामध्ये अडीच लाख किमतीचे रॅडो कंपनीचे घड्याळ, दिमतीला आलिशान गाडी अशा रूबाबात मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक असल्याचे खोटे सांगून कोल्हापुरातील दोघा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातला.
संशयित आरोपी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असून राजकुमार ज्ञानदेव पाटील (वय ४२, रा. ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई) त्याचे नाव आहे. भामटा राजकुमार याचे मूळ गाव वडूज (जि. सातारा)आहे. तो सन १९९८ मध्ये मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदावर भरती झाला.
सेवेत असताना त्याने चंद्रपूरला नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक केल्याने तो निलंबित झाला. त्याने १६ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर बनवेगिरी करण्यास सुरुवात केली. नागरिकांना मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक असल्याची सांगून भुरळ पाडत होता. त्याने काहीजणांना राजकुमार डी. पाटील (पोलीस निरीक्षक) या नावाचे व्हिजिटिंग कार्ड देखील दिले आहे.
पंढरपूर (जि. सोलापूर) येथेही एकाला लाखो रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर तो फरार झाला. त्यानंतर त्याने मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत फिरताना आलिशान हॉटेलमध्ये राहत असे. जेवण करून बाहेर पडताना पोलीस निरीक्षकाचे कार्ड दाखवून बिल न देताच निघून जात असे. महागड्या वस्तूच्या बदल्यात दुकानदाराला धनादेश देत तो सरकारी खात्यावरील असल्याचे सांगत असे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्याने दुकानातून रॅडो कंपनीचे २ लाख ५० हजार किमतीचे घड्याळ नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची छबी कैद झाल्यानंतर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तो मित्रांना भेटायला आल्याचे समजताच लष्कर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन व्हिजीटिंग कार्ड, दोन मोबाईल, बँकेचे कार्ड आणि त्याने २७ हजार ५०० रुपये किमतीचे घड्याळ हस्तगत केले.