वृद्ध कलावंत मानधन ५ महिने थकीत, कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:37 PM2019-07-19T12:37:42+5:302019-07-19T12:37:55+5:30
राज्य शासनाच्या वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाला निधीच वर्ग न केल्याने राज्यभरातील वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले आहे. किमान औषधपाण्यासाठी तरी हे मानधन उपयोगाला येत होते. मात्र ते रखडल्याने ही मंडळी हवालदिल झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ वृद्ध साहित्यिक आणि कलाकार असून राज्यभरात किमान पंचवीस हजारांहून जास्त कलावंतांना त्याचा लाभ होतो. या योजनेतून अ, ब आणि क या तीन गटांमध्ये साहित्यिक आणि कलाकार यांची वर्गवारी करून त्यानुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५०० रुपये मानधन दरमहा देण्यात येते.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : राज्य शासनाच्या वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाला निधीच वर्ग न केल्याने राज्यभरातील वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले आहे. किमान औषधपाण्यासाठी तरी हे मानधन उपयोगाला येत होते. मात्र ते रखडल्याने ही मंडळी हवालदिल झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ वृद्ध साहित्यिक आणि कलाकार असून राज्यभरात किमान पंचवीस हजारांहून जास्त कलावंतांना त्याचा लाभ होतो. या योजनेतून अ, ब आणि क या तीन गटांमध्ये साहित्यिक आणि कलाकार यांची वर्गवारी करून त्यानुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५०० रुपये मानधन दरमहा देण्यात येते.
मान्यवर वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना मानधन देण्याची ही योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १९५५ पासून सुरू आहे. या कलावंतांना या मानधनाचा खूप उपयोग होतो. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील त्या साहित्यिकांचे, कलाकारांचे कार्य पाहून ही वर्गवारी ठरविण्यात येते. हे अनुदान जरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अदा केले जात असले तरी या साहित्यिक, कलाकार यांची निवड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाद्वारे करण्यात येते. त्यासाठी शासनाने अशासकीय सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. ती दरवर्षी अर्ज मागवून घेते आणि ६० नवीन कलाकारांची निवड करते.
या योजनेतून मानधन घेत असलेल्या पुरुषाचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीला किंवा पत्नीचे निधन झाल्यास पतीला मानधन देण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील ३५, ४८ आणि ११०१ साहित्यिक आणि कलाकार अनुक्रमे अ, ब, क वर्गवारीमध्ये मोडतात. जानेवारी २०१९ चे मानधन सर्वांच्या खात्यावर जमा झाले.
गेले पाच महिने मानधन नसल्याने कलेची अव्याहत सेवा केलेल्या कलाकारांच्या आयुष्याची संध्याकाळ उपासमारीने जात आहे. अनेक वृद्धांकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. जगण्यासाठी कसरत करावी लागते; पण कुणालाही त्याची पर्वा नाही.मात्र त्यानंतर मात्र या मानधनाची प्रतीक्षा आहे.भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते
साहित्यिक आणि कलाकार यांचे मानधन थकल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हे मानधन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही याबाबत लवकरच भेट घेणार आहोत.
- मेघराज भोसले, अध्यक्ष,
अ. भा. चित्रपट महामंडळ, कोल्हापूर-