माध्यमिक शिक्षकांना मिळणार थकीत वेतन : शिक्षण संचालकांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:46 AM2018-03-31T00:46:19+5:302018-03-31T00:46:19+5:30
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : तब्बल एक वर्षानंतर माध्यमिक शिक्षकांना त्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन आता एप्रिलमध्ये मिळणार आहे. वेतन अदा करण्यास राज्य शिक्षण संचालकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन दि. १ डिसेंबर २०१६ पासून समायोजित शाळेतून काढावे, असा आदेश शिक्षण आयुक्तांनी पारित केला. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नसलेल्या सर्व समायोजित शाळेतील शिक्षकांचे वेतन अदा झाले नव्हते. यावर शिक्षक संघटनांनी आंदोलन करून वेतन अदा करण्याची मागणी केली.
यानंतर शिक्षण विभागाकडून मार्च २०१७ मध्ये वेतन अदा करण्याचा आदेश झाला; पण अतिरिक्त शिक्षकांना शालार्थ प्रणालीमध्ये अटॅच आणि डीटॅच करण्याच्या प्रक्रियेत वेतन अदा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. यातच मार्च २०१७ पूर्वीचे वेतन शिक्षण संचालकांच्या परवानगीशिवाय अदा करण्यात येऊ नये, असा शिक्षण विभागाकडून आदेश जुलै २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला.
या आदेशामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीतील वेतन रखडले. हे वेतन अदा करण्याबाबत खासगी शिक्षक महासंघ, महानगर माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक, संचालक आणि आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत शिक्षण संचालकांनी माध्यमिक शिक्षकांचे हे थकीत वेतन अदा करण्यास मंजुरी देऊन याबाबतचे आदेश वेतन पथक कार्यालयास गुरुवारी (दि. २९) दिले आहेत. या आदेशांमुळे माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
अतिरिक्त व नियमित शिक्षकांच्या थकीत वेतन अदा करण्याच्या लढ्याला शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी ताकद दिली. थकीत वेतन अदा करण्याचा निर्णय झाल्याने आमदार गाणार आणि शिक्षण विभागाचे आभार मानतो. पुढील काळात थकीत वेतन राहू नये याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी.
- संतोष आयरे, राज्य उपाध्यक् ष,खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ
या थकीत वेतनाबाबत वर्षभर निवेदने, आंदोलने, आदींद्वारे शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाल्याचा आनंद आहे. या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षकांचा थकीत वेतन, अन्य देयके अदा करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. थकीत वेतनाच्या मंजुरीसाठी शिक्षण संचालकांच्या परवानगीचा जुलै २०१७ चा आदेश रद्द करण्यासाठी संघातर्फे पाठपुरावा केला जाणार आहे.
- राजेश वरक, अध्यक्ष,माध्यमिक शिक्षक संघ
माध्यमिक शिक्षकांचे थकीत असलेले वेतन, देयके अदा करण्याचा आदेश गुरुवारी (दि. २९) आमच्या कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार कार्यवाही सुरू असून, दि. ४ अथवा ५ एप्रिलपर्यंत वेतन आणि अन्य देयके अदा केली जातील.
- शंकरराव मोरे, माध्यमिक वेतन पथक अधीक्षक, कोल्हापूर.