कामात सुस्ताई, पण टोलची घाई
By admin | Published: March 30, 2016 12:34 AM2016-03-30T00:34:49+5:302016-03-30T00:39:16+5:30
शिरोलीत टोलनाक्यांची उभारणी : रस्त्याची ३० टक्के कामे अपूर्ण असल्याचा आंदोलकांचा दावा
सतीश पाटील -- शिरोली -कोल्हापूर-सांगली रस्त्यावर टोल बसवायला सुप्रीम कंपनीने घाई केली आहे; एवढ्या घाईने काम केले असते, तर एक वर्षापूर्वीच रस्ता पूर्ण झाला असता, अशी परिस्थिती आहे. चार वर्षांत रस्त्याचे जे काम झाले आहे, त्याबद्दलसुद्धा साशंकता आहे.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच कंपनीने टोल वसुलीची १ मे ही तारीखसुद्धा जाहीर केली आहे. अंकली आणि शिरोली येथे टोलनाके उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही रस्त्याचे ३0 टक्क्यांपेक्षा जास्त काम बाकी आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. कंपनीने दोन वर्षांत काम पूर्ण करायचे होते; पण तब्बल साडेतीन वर्षे झाली तरी अजून रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. अतिग्रे येथील एक किलोमीटरमधील घरे निघालेली नाहीत. हातकणंगले येथील ८00 मीटरच्या उड्डाणपुलाला अजून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरीच दिलेली नाही. सुप्रीम कंपनीने कोणतीही मंजुरी घेण्यापूर्वीच उड्डाणपूल बांधायला सुरुवात केली होती. या पुलासाठी ३२ कोटी रुपये जादा खर्च अपेक्षित असल्याने ते काम अपूर्ण आहे. तमदलगे येथील भूसंपादन झालेले नाही. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये लोकांची घरे येतात. त्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतरच तेथील लोकांचे स्थलांतर होणार, पण अद्याप पैसेच मिळालेले नाहीत. त्यामुळे दोन किलोमीटरमधील ४0 घरांचा आणि धनगर समाजाच्या मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे. अंकली येथील पुलाचे काम अपूर्ण आहे. हेरले, अतिग्रे, उदगाव, जयसिंगपूर येथील अपुरे रस्त्याचे काम, सांगली, अंकली येथील भूसंपादन झालेले नाही, एवढे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंपनीला एक वर्ष लागेल; पण कंपनी रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करीत १ मेपासून टोल सुरू करण्यासाठी सुप्रीम कंपनी शिरोली आणि अंकली येथे टोलनाके उभारत आहे; पण याला जनतेतून विरोध होण्याची चिन्हे दिसत आहे.