शिष्यवृत्तीधारकांसाठी तायशेटेंनी दिले मानधन
By admin | Published: November 18, 2014 09:32 PM2014-11-18T21:32:08+5:302014-11-18T23:21:53+5:30
मार्गदर्शक शिक्षकांना कौतुकाबरोबरच स्फूर्ती मिळावी, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा,
आमजाई व्हरवडे : शिष्यवृत्ती परीक्षेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहावी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना कौतुकाबरोबरच स्फूर्ती मिळावी, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, म्हणून तालुक्यातील अशा यशवंतांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी आपले मानधन देण्याचा प्रेरणादायी निर्णय जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांनी जाहीर केला.राधानगरी येथे झालेल्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रूपालीताई पाटील होत्या. या त्यांच्या सामाजिक बांधीलकीचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत व कौतुक होत आहे. गेल्या १५ वर्षांपासून शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या राधानगरी तालुक्याने अनेकदा राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे, तर हजारो विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. मात्र, दोन वर्षांपासून ही परंपरा खंडित झाली आहे. दरवर्षी शिक्षक पतसंस्था व अन्य सेवाभावी संस्थांच्यावतीने या गुणवंतांचे सत्कार होतात. शिक्षकांची अपेक्षा असतानाही पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला असे कार्यक्रम घेताना आर्थिक मर्यादा येत आहेत, असे निदर्शनास आल्याने तायशटे यांनी सभापतिपदाच्या कार्यकालात या गुणगौरव समारंभाचा खर्च स्वत:च्या मानधनातून करण्याचा निर्णय घेतला आहे. खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू व्हावी, गुणवंतांना प्रेरणा मिळावी, हाच आपला हेतू यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपसभापती सुप्रिया साळोखे, अजित पोवार, गटविकास अधिकारी ए. डी. नाईक, गटशिक्षणाधिकारी माधवमांडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपा पाटील, मंगल कलिकते, जयसिंग खामकर, प्रल्हाद पाटील, आदी उपस्थित होते. डी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)