Chhatrapati Shahu Maharaj: शाहूराजासाठी कोल्हापूर झालं १०० सेकंद स्तब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 10:38 AM2022-05-06T10:38:46+5:302022-05-06T10:49:04+5:30
कोल्हापूर : दीनांचे कैवारी, रयतेचे राजे, पुरोगामी चळवळीचे प्रणेते, संस्थानातील जनतेला सुखी करण्यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा लोकराजा राजर्षी छत्रपती ...
कोल्हापूर : दीनांचे कैवारी, रयतेचे राजे, पुरोगामी चळवळीचे प्रणेते, संस्थानातील जनतेला सुखी करण्यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ठिक १० वाजता सारं कोल्हापूर स्तब्ध झालं. सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळत शाहूंना आदरांजली वाहली. यामुळे सकाळच्या सुमारास रस्त्यावर असलेली गजबज आज १०० सेकंद जागच्या जागी थांबली.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने शाहू समाधी स्थळ येथे शाहू छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले. तर, नागरिकांनी हातातील सर्व कामे सोडून १० च्या आधीच सर्व तयारी केली होती. यानंतर सर्वांनी आपापल्या कार्यालय, दुकानासमोर शाहूंना आदरांजली वाहली. शाहू महाराजांच्या जागराने अवघे कोल्हापूर शाहूमय झाले आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी अवघ्या २८ वर्षांच्या राज्य कारकिर्दीत डोंगराएवढे काम करून कोल्हापूरला विकासाचे रोल मॉडेल करण्याच्यादृष्टीने पावले उचलली. धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या या दूरदृष्टीची फळे आजही कोल्हापूर चाखत आहे. या लोकराजाचा मृत्यू ६ मे १९२२ रोजी झाला. या घटनेला शुक्रवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २२ मे पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापुरात फक्त शाहूंचा जागर
शाहू कृतज्ञता पर्व अंतर्गत १८ एप्रिलपासून जिल्ह्यात शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर करणारे उपक्रम घेतले जात असून, महाराजांनी स्थापन केलेली ऐतिहासिक बांधणीची शाहू मिल २० वर्षांनी सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे. शाहूकालीन छायाचित्र, कलाकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, गुजरी सुवर्णजत्रा, १०० व्याख्याने असे उपक्रम झाले आहेत. तर पुढील नियोजनात मिरची मसाला जत्रा, कापड जत्रा, कुस्त्यांचे मैदान असे अनेकविध कार्यक्रम होणार आहेत.