कोल्हापुरातील सबजेलच्या भिंतीवर 'इलेक्ट्रिक फेन्सिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:51 PM2024-04-18T15:51:15+5:302024-04-18T15:51:39+5:30
कारागृहात सध्या १४० कैदी
कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलच्या भिंतीवरून उडी टाकून कैदी पळून जाऊ नयेत यासाठी सुरक्षा भिंतीवर तारांचे कुंपण लावले असून, त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे. इलेक्ट्रिक फेन्सिंगमुळे कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाल्याची माहिती अधीक्षक सचिन साळवे यांनी दिली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये बिंदू चौक सबजेलच्या सुरक्षा भिंतीवरून उडी टाकून धनराज कुमार या परप्रांतीय कैद्याने पलायन केले होते. पळालेला कैदी काही तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवर इलेक्ट्रिक फेन्सिंग लावण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता.
त्यानुसार फेन्सिंगला मंजुरी मिळून संपूर्ण सुरक्षा भिंतीवर तारांचे कुंपण लावण्यात आले. त्यात उच्चदाब विद्युत प्रवाह सोडण्यात आला आहे. एखाद्या कैद्याने भिंतीवरून जाण्याचा प्रयत्न केल्यास तारांचा स्पर्श होताच तो विजेच्या धक्क्याने फेकला जाईल, तसेच अलार्म वाजून सुरक्षा रक्षक सतर्क होतील, अशी माहिती कारागृह अधीक्षक साळवे यांनी दिली.
कारागृहात सध्या १४० कैदी
सबजेलमध्ये सध्या १४० कैदी आहेत. यात आठ महिला कैद्यांचा समावेश आहे. जेलमधील सर्व बरॅक आणि परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. कैद्यांसाठी न्यायालयातील सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध आहे.
बुधवारी नेत्र तपासणी शिबिर
कैद्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (२४) शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
रिल्स रोखण्यासाठी उपाययोजना
जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहातून बाहेर पडणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे मित्रांकडून मोबाइलवर शूटिंग घेतले जाते. जेलच्या प्रमुख दरवाजातून बाहेर येणारा गुन्हेगार आणि त्याच्या स्वागताचे रिल्स सोशल मीडियात व्हायरल केले जातात. असे प्रकार रोखण्यासाठी जेलबाहेर शूटिंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती अधीक्षक साळवे यांनी दिली.