वस्त्रोद्योगाला कनेक्टिव्हिटी देणार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:21 PM2023-01-20T14:21:19+5:302023-01-20T14:21:49+5:30
सन २०३० पर्यंत जगातील ३ नंबरची शक्ती भारत असेल.
इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यावर काम सुरू आहे. वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल व नारायण राणे यांच्याशी यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. मॅँचेस्टरनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वस्त्रनगरीला देशपातळीवर कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्रकार बैठकीत दिले.
पूर्वी शंभर, दोनशे आरपीएमचे यंत्रमाग होते. आता १२०० ते १५०० आरपीएमचे यंत्रमाग आले. त्यातून उत्पादन क्षमता वाढली आहे. येथील काही व्यापारी आपले उत्पादन परदेशात पाठवतात. तेथून ते ब्रॅण्डेड म्हणून पुन्हा भारतात येते. त्याला चालना देण्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत. काही व्यापारी व कार्यकर्त्यांनीही याबाबत मागणी केली आहे.
कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरण करण्याचे नियोजन आहे. कोल्हापुरातून पाच ठिकाणी विमान उड्डाण सुरू आहे. त्याची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे काम सुरू आहे. देशात परिवर्तन होत आहे. सन २०३० पर्यंत जगातील ३ नंबरची शक्ती भारत असेल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी ठेवून कार्य करीत आहेत, अशी माहिती दिली.
दरम्यान, भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सिंधिया म्हणाले, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये कमळ फुलविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने मोट बांधून कामाला लागावे. तळागाळातील लोकांपर्यंत भाजपचे काम पोहोचवा. त्यातून याठिकाणी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. केंद्राने गाव तिथे प्रगती अशी संकल्पना राबवली आहे.
ग्रामीण भागाचा विकास तरच शहराचा विकास, यामुळे ग्रामीण भागातील अडीअडचणींकडे केंद्र सरकारने आता लक्ष घालणे सुरू केले आहे. सबका साथ, सबका विकास हवा असेल, तर सबका प्रयास गरजेचा आहे. यावेळी आमदार गोपीनाथ पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवतीर्थवर स्वागत
इचलकरंजीत मंत्री सिंधिया यांचे शिवतीर्थावर ढोल वाजवत फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इचलकरंजीसह हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
लिफ्ट बंद
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सन १९६७ साली राजमाता विजयाराजे शिंदे (ग्वाल्हेर) यांनी केले होते. त्या ज्योतिरादित्य यांच्या आजी होत. तेथे अभिवादन करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. परंतु, ढिसाळ नियोजनामुळे लिफ्ट बंद असल्याने त्यांना महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करता आला नाही. त्यांना खालूनच अभिवादन करून परतावे लागले.