निपाणी भागात तंबाखूला १५० रुपये उच्चांकी दर

By Admin | Published: March 23, 2015 09:28 PM2015-03-23T21:28:38+5:302015-03-24T00:19:21+5:30

शेतकऱ्यांतून समाधान : गुजरातचे बिछाईत दाखल, हंगामातील तंबाखू खरेदी-विक्रीला प्रारंभ

Tobacco prices in the Nipani area are Rs 150 per quintal | निपाणी भागात तंबाखूला १५० रुपये उच्चांकी दर

निपाणी भागात तंबाखूला १५० रुपये उच्चांकी दर

googlenewsNext

राजेंद्र हजारे - निपाणी  कर्नाटक सीमाभागातील निपाणी आणि परिसरात यंदाच्या हंगामातील तंबाखू खरेदी-विक्रीला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या काळापासूनच तंबाखूला खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यंदा खरेदी-विक्रीच्या हंगामाच्या पहिल्या आठवड्यातच निपाणी, अकोळ, खडकलाट येथील दर्जेदार तंबाखूला ९० ते १५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.कापशी खोऱ्यातील तंबाखूने शंभरी उलटल्याने निपाणी परिसरात दीडशतकी दराची अपेक्षा होती. गतआठवड्यात निपाणी परिसरात १४५ रुपये प्रति किलो दराने तंबाखू खरेदी झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. आता अकोळ येथील तंबाखूला १५३ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.यंदाच्या तंबाखू पिकाचा हंगाम प्रथमपासूनच चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. सुरुवातीस तंबाखू तरूच्या टंचाईने लावणी हंगामाची दमछाक झाली. तरीही पावसाने गरजेवेळी हजेरी लावल्याने तंबाखूला पोषक वातावरण निर्माण झाले. भरणीही चांगल्याप्रकारे झाल्याने वजनाबरोबर दर्जाही चांगला राहिला आहे. मध्यंतरी वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली होती, पण थोडक्यात सावरल्याने शेतकऱ्यांवरील संकट बाजूला झाले.
यंदा तंबाखू खरेदीचा हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. पहिल्याच टप्प्यात कापशी खोऱ्यात १०० ते ११० रुपये प्रति किलो दर देण्यात आला. थोड्याफार फरकाने अन्यत्रही खरेदी व्यवहारांना प्रारंभ झाला.किरकोळ व्यापाऱ्यांनी पळून-पळून खेळ सुरू केला आहे. जमेल आणि जुळेल तितका तंबाखू खरेदी करून व्यापाऱ्यांना विकण्यासाठी किलोमागे पाच-पन्नास रुपये सुटल्यास बिघडले कुठे, असा एक नवाच प्रकार अस्तित्वात आला आहे. मिळेल तेथून मिळेल त्या दराने मिळेल तितका तंबाखू खरेदी करण्याचे प्रस्थ सुरू झाले आहे. मग किरकोळ व्यापाऱ्यांनी लहान-लहान तंबाखू ९० ते १०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने खरेदी केला.
यंदाच्या तंबाखूला गुणवत्ता व दर्जा चांगल्या असल्याने या मंडळींनी थांबण्याचे नावच काढले नाही. सध्या गुजरात, बंगलोर, मंगळूर, जयसिंगपूरसह अन्य विभागातील बिछाईतदारांनी निपाणी भागात तंबाखू खरेदीला सुरुवात केली आहे. गुजरात विभागात तंबाखूचे उत्पादन कमी झाल्याने या भागातील तंबाखू खरेदीवर भर देण्यात आला आहे. यंदा तंबाखूचा स्वाद व दर्जा चांगला असल्याने दरही विक्रमी मिळत आहे. लवकरच मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीला सुरुवात होणार आहे.

Web Title: Tobacco prices in the Nipani area are Rs 150 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.