तंबाखू व्हॅटप्रश्नी लवकरच निर्णय घेऊ
By admin | Published: January 2, 2015 11:46 PM2015-01-02T23:46:24+5:302015-01-03T00:16:40+5:30
सुधीर मुनगंटीवार : जयसिंगपुरातील शिष्टमंडळाने मांडले गाऱ्हाणे
जयसिंगपूर : अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्केव्हॅटप्रश्नी येत्या दहा दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जयसिंगपूर येथील शिष्टमंडळाला दिले. आंध्र, कर्नाटक व गुजरात या राज्याच्या वित्तमंत्री व वित्तसचिव यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.
आघाडी सरकारच्या काळात राज्यातील अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के व्हॅट लागू करण्यात आला होता. राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या जयसिंगपूर शहरातील तंबाखू व्यवसाय व्हॅटमुळे मोडकळीस आला आहे. वेळोवेळी याप्रश्नी शासनकर्त्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. व्यापारी आणि कामगारांच्या मागणीकडे शासनकर्त्यांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे व्हॅटचा तिढा सुटला नाही. नव्या सरकारकडून हा प्रश्न सुटेल यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान, व्हॅटप्रश्नी आज, शुक्रवारी मुंबई येथे मंत्रालयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमेवत तंबाखू व्यापारी तसेच खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांनी बैठक घेतली. तंबाखूवरील व्हॅटमुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. आंध्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये तंबाखूवर व्हॅट आकारला जात नाही. याबाबत महाराष्ट्रात कसा तोडगा निघेल, यासाठी तिन्ही राज्यांच्या वित्तसचिव व मंत्र्यांची लवकरच बैठक घेतली जाईल. येत्या दहा दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
शिष्टमंडळात भाजपचे मंडल अध्यक्ष विठ्ठल पाटील, राजेंद्र दार्इंगडे, सुरेश शिंगाडे, सुनील शर्मा, व्यापारी प्रमोद चोरडिया, गोपाळ मालू, प्रसन्न लुनिया, प्रसन्न बलदवा, गोविंद बजाज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)