आज अक्षय तृतीया, आंब्याची खरेदी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:54+5:302021-05-14T04:22:54+5:30
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय तृतीया आज शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ...
कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय तृतीया आज शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या बाजारपेठा बंद आहेत, भीती आणि तणाव असल्याने यंदा हा सण घरातल्या घरातच साजरा होणार आहे. तर मुहुर्ताची खरेदीही हुकणार आहे. यादिवशी अंबाबाईच्या उत्सव मूर्तीची झोपाळ्यातील पूजा बांधली जाते.
गुढीपाडव्यानंतर जवळपास एक महिन्याने अक्षय तृतीया येते, यादिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्सव मूर्तीची गरुड मंडपात सजलेल्या झोपाळ्यातील सुंदर पूजा बांधली जाते. यानिमित्त गुरुवारी देवीच्या चांदीच्या आसनाची स्वच्छता करण्यात आली. दुसरीकडे घराघरात पुरणपोळी आंब्याचा रस अशा पंचपक्वान्नांचा बेत असतो. या दिवसापासून घराघरात आंबा आणायला सुरुवात होते. यंदा मात्र बाजारात खूप लवकर आंबा आल्याने अक्षय तृतीयेच्या आधीच नागरिकांनी आंब्याचा स्वाद घेतला आहे. लॉकडाऊनमुळे आंब्याचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांनाही त्याची खरेदी करता आली. यादिवशी घरात शुभकार्य झाले, नव्या वस्तूची खरेदी झाली की घरात अक्षय समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी सोन्याच्या खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी या सणावर कोरोनाचे सावट आहे, सध्या राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू आहे, त्यामुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याने यंदा मुहुर्ताची खरेदी हुकली आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहून हा सण साजरा करावा लागणार आहे.
--
फोटो नं १३०५२०२१-कोल-अंबाबाई तयारी
ओळ : अक्षय तृतीयेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा बांधली जाते यानिमित्त सणाच्या पूर्वसंध्येला देवीच्या चांदीच्या आसनाची स्वच्छता करण्यात आली.
--