कोल्हापूर ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:26 AM2018-08-20T00:26:00+5:302018-08-20T00:26:06+5:30
कोल्हापूर : निर्भीड, निष्पक्ष आणि विधायक पत्रकारितेतील मानदंड असलेल्या ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा चौदावा वर्धापनदिन आज, सोमवारी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता महापौर शोभा बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ऐतिहासिक तसेच धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या रांगड्या कोल्हापुरात ‘लोकमत’ने चौदा वर्षांपूर्वी पाऊल ठेवले, तेव्हापासून आजतागायत घडलेल्या स्थित्यंतरांचा साक्षीदार म्हणून ‘लोकमत’ने आपल्या लेखणीची मशाल तेवत ठेवली. वृत्तपत्र म्हणून समाजात घडणाऱ्या बºया-वाईट घटना जनतेपर्यंत पोहोचवितानाच ‘लोकमत’ने समाजाप्रती असलेली बांधीलकी जपत विधायक पत्रकारितेला आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले आहे; त्यामुळेच ‘लोकमत’ने घराघरांत आणि मनामनांत विश्वासाचे व आपुलकीचे नाते निर्माण केले. ‘लोकमत’ने बाल विकास मंच, युवा नेक्स्ट आणि सखी मंच यांच्या माध्यमातून समाजाचा मुख्य घटक असलेल्या या नव्या पिढीला स्वतंत्र व्यासपीठ दिले. जबाबदार नागरिक म्हणून व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि वैचारिक परिपक्वता येण्यासाठीचे माध्यम म्हणून ‘लोकमत’ परिवार काम करीत आहे. अल्पावधीतच कोल्हापूरकरांशी नाळ जुळलेला ‘लोकमत’ म्हणजे एक मोठा परिवारच. या परिवाराला आपल्याकडून मिळणाºया शुभेच्छा यापुढेही निर्भीडपणे काम करण्याची ऊर्मी देतात. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की, लेखणीची धारही अधिक तळपते, म्हणूनच तुमच्या-आमच्या आणि कोल्हापूरकरांच्या ‘लोकमत’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास समस्त कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी केले आहे.
दरम्यान, यावर्षी वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे ‘आरोग्य संपदा’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. हा विशेषांक रविवारपासून वाचकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे आरोग्यविश्व, सुविधा आदींचा वेध घेण्यात आला आहे. या विशेषांकाचे वाचकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.
स्नेहमेळाव्याची वेळ
वेळ : सायंकाळी
पाच ते रात्री साडेआठ
स्थळ : महासैनिक दरबार हॉल