‘लोकमत’तर्फे भवानी मंडपात आज मानवी साखळी
By admin | Published: August 5, 2016 11:47 PM2016-08-05T23:47:25+5:302016-08-06T00:22:30+5:30
चला, स्त्रीसन्मानाचा जागर करूया...: विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती; मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन
कोल्हापूर : आई, बहीण, पत्नी अशा अनेक नात्यांचे बंध हसत-हसत सांभाळणाऱ्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी आज, शनिवारी भवानी मंडपात जमूया... अन्याय-अत्याचारांच्या घटना घडत असतानाही आपल्या ध्येयापासून न डगमगता आपले कार्य करीत राहणाऱ्या स्त्रीबद्दलचा आदरभाव व्यक्त करीत मैत्रीचे धागे विणताना, कोसळणाऱ्या पावसाच्या सरींना न जुमानता मोठ्या संख्येने एकत्र येऊन स्त्रीशक्तीचा जागर करूया...
समाजमनांत स्त्रीत्वाचा सन्मान वाढावा, या भावनेने ‘लोकमत’तर्फे आज, शनिवारी म्हणजेच मैत्रीदिनाच्या निमित्ताने ‘धागा जोडू मैत्रीचा... सन्मान करू स्त्रीत्वाचा...’ ही संकल्पना घेऊन भवानी मंडपात सकाळी १० वाजता मानवी साखळी करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एकविसाव्या शतकात पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रीविषयी असलेल्या अवहेलनेच्या समजुतीतून देशभरात महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्याचीच समाजाला चिंता आहे. मग नुसती चिंता करण्यापेक्षा त्यातून मार्गही आपल्यालाच शोधायचा आहे. त्याची सुरुवात खरेतर तुमच्या-आमच्या सर्वांच्याच घरापासून व्हायला हवी. त्यासाठीची जाणीवजागृती हाच या मानवी साखळीचा मुळ हेतू. ‘लोकमत’तर्फे आयोजित या मानवी साखळीद्वारे स्त्रीमनांत असलेली असुरक्षितता काढून तिने निर्भयपणे जगण्यासाठी आश्वासक वातावरण तयार करूया. मैत्रीचा हा आश्वासक हात फक्त महिलांनी महिलांसाठी द्यायचा नाही, तर लहान मुले-मुली, विद्यार्थी विद्यार्थिनी, गृहिणी, नोकरदार, महिला, पुरुष, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, अशा समाजातील सगळ्या घटकांनी त्यासाठी पुढे यायचे आहे. म्हणूनच या उपक्रमात विविध संस्थांसह शाळा, महाविद्यालये, सखी मंच सदस्या व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप असे
सकाळी १० वाजता भवानी मंडपात जमणे
पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मधुरिमाराजे छत्रपती आदी मान्यवरांचे मनोगत
बालशाहीर दीप्ती सावंत, तृप्ती सावंत यांचा पोवाडा
करवीर नाद पथकाचे ढोलवादन
मानवी साखळी
स्त्रीसन्मानाची शपथ
कार्यक्रमाची सांगता
हे रस्ते बंद राहतीलमानवी साखळीदरम्यान भवानी मंडपात वाहनांना बंदी असेल. भवानी मंडपाचे मुख्य प्रवेशद्वार व म. ल. ग. हायस्कूल येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. मेन राजाराम हायस्कूल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.