‘अन्नपूर्णा’ कारखान्याचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:37 AM2017-08-14T00:37:14+5:302017-08-14T00:37:14+5:30

Today Bhumi Pujan of 'Annapoorna' factory | ‘अन्नपूर्णा’ कारखान्याचे आज भूमिपूजन

‘अन्नपूर्णा’ कारखान्याचे आज भूमिपूजन

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथे श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॉगरी या साखर कारखान्याच्या उभारणीचे भूमिपूजन आज, सोमवारी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज व परमाधिकार राजीवजी महाराज या दोन महनीय व्यक्तींच्या हस्ते होत आहे. या माध्यमातून कागल तालुक्यात पाचव्या साखर कारखान्याची उभारणी होणार आहे. यामुळे सत्तेपासून दूर असणाºया संजय घाटगे गटाच्या एकसंधतेचे ‘ध्रुवीकरण’ साधणार असून, याचा लाभ घाटगे यांना यापुढील राजकारणात होणार असल्याचेही राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे. कारखाना उभारणीच्या आरंभामुळे संजय घाटगे गटात नवचैतन्य पसरले आहे.
कागल तालुक्याच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित गट-तट यालाच अधिक महत्त्व आहे. त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आणि गटाच्या वाढीसाठी येथील नेतेमंडळींना नेहमीच धडपड करावी लागत आहे.
सध्या, तालुक्यात चार प्रमुख गट आहेत. यामध्ये समरजितसिंह घाटगे यांच्याकडे ‘शाहू’ची सत्ता, प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे ‘हमीदवाडा’ची, तर आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे ‘संताजी घोरपडे’ कारखान्याची सत्ता आहे. त्या तुलनेत माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे साखर कारखान्याची उणीव भासत आहे. त्यामुळे संजय घाटगे गटाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह सर्वांनीच आपल्या हक्काचा कारखाना व्हावा. गटातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे. आपल्या गटाच्या शेतकºयांनी पिकविलेला ऊस वाळून आणि जाळून न जाता तो वेळेत जावा या बहुद्देशाने अन्नपूर्णा कारखान्याच्या उभारणीचा घाटगे यांनी चंग बांधला आहे.
विशेष म्हणजे जून महिन्यात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आडी-मल्लय्या येथे व्यापक बैठक घेऊन हा कारखाना उभारणीसाठी संजय घाटगे यांच्यावर दबाव आणला, तर घाटगे यांनीही कार्यकर्त्यांच्या मागणीला
मान देऊन ते या कारखान्याच्या उभारणीचा निर्धार करीत कार्यकर्त्यांच्या जोरावर हे शिवधनुष्य उचलले आहे.
घाटगे यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. सध्या सहकार तत्त्वावर साखर कारखाना उभारणीला परवानगी नाही. त्यामुळे
हा कारखाना खासगी स्वरूपात
असला तरी ऊस दर आणि सर्व सेवा सुविधा अन्य कारखान्यांप्रमाणेच असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका पटवून दिली असून, कार्यकर्त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.
शेतकरी बांधवांना आवाहन
केनवडे (ता. कागल) येथील ‘अन्नपूर्णा शुगर’चा भूमिपूजन समारंभ आज, सोमवारी सकाळी १०.३० वाजता होत आहे. प. पू. काडसिद्धेवर स्वामीजी (कणेरी मठ), परमाधिकार परमात्मराज महाराज (आडी) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, अरुण इंगवले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंसह कार्यकर्त्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘अन्नपूर्णा’चे संस्थापक संजय घाटगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
दृष्टिक्षेपात ‘अन्नपूर्णा कारखाना’
कागलमध्ये सध्या शाहू, मंडलिक व बिद्री हे सहकारी आणि सर सेनापती संताजी घोरपडे हा खासगी कारखाना कार्यरत आहे, तर अन्नपूर्णा हा खासगी स्वरूपात उभारण्यात येणार आहे.
या कारखान्याची प्रतिदिन दीड हजार मे. टन ऊस गाळपाची क्षमता असली तरी प्रतिदिन दोन हजार मे. टनांपर्यंत गाळप होऊ शकते.
या कारखान्याच्या उभारणीसाठी सुमारे ४० कोटी रुपयांची गरज असून, १८ ते २० कोटी रुपये शेअर्स भांडवल जमा होईल, असा अंदाज आहे.
केनवडे गावच्या उत्तरेला असणाºया विस्तीर्ण डोंगर पठारावर उभारणारा हा कारखाना आॅक्टोबर २०१८ पर्यंत ऊस गाळपासाठी सज्ज होईल, असा अंदाज आहे.

Web Title: Today Bhumi Pujan of 'Annapoorna' factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.