‘चक्का जाम’ आंदोलन आजपासून
By admin | Published: October 1, 2015 12:57 AM2015-10-01T00:57:39+5:302015-10-01T00:58:07+5:30
१६ हजार मालवाहतूकदारांचा सहभाग : टोल, टीडीएस रद्दची मागणी
कोल्हापूर : देशांतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर असणारे ३७२ टोलनाके बंद करून वार्षिक टोल परमिट द्यावे, टीडीएस रद्द यांसह अन्य मागण्यांसाठी आज, गुरुवारपासून देशातील मालवाहतूकदार बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात कोल्हापुरातील १६ हजार मालवाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.
केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या टोल आणि वाहनधारकांकडून बिल देण्यापूर्वी वसूल केला जाणारा टी.डी.एस. रद्द करावा, या मागणीसह राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारा पर्यावरण कर, व्यवसाय कर रद्द करावा व जुन्या वाहनांना स्पीड गव्हर्नरची सक्ती करू नये, आदी मागण्यांबाबत हा ‘चक्का जाम’ आजपासून बेमुदत केला जाणार आहे. याबाबत वाहतूक व्यावसायिकसुद्धा राजी झाले असून, त्यांनी २७ सप्टेंबरपासूनच मालाची नोंदणी बंद केली आहे. मुळात वाहतूकदारांचा टोलला विरोध नाही. टोलवसुली ही वार्षिक टोल परमिटच्या रूपाने एकरकमी घ्यावी. टोलच्या रूपाने १४ हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जात आहेत. त्यात एकरकमी घेतल्याने आणखी वाढ होईल. यामुळे चारचाकी खासगी वाहनधारकांवर टोलवसुलीचा कोणताही बोजा पडणार नाही. याबाबत वेळोवेळी आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन, निवेदन दिले आहे. मात्र, सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आजपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यावेळी उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले, शिवाजी चौगले, बाबल फर्नांडिस, विलास पाटील, पंडित कोरगांवकर, जगदीश सोमय्या, प्रकाश भोसले, विजय पोवार, विक्रम पाटील, उमेश महाडिक, वामन चौगले, आदी उपस्थित होते.
आंदोलनास चेंबर्स आॅफ कॉमर्सचा पाठिंबा
या ‘चक्का जाम’मध्ये जिल्ह्यातील १६ हजार मालवाहतूकदार, ९०० टँकर, ११ हजार टेम्पोधारक आणि जिल्हा वाळू वाहतूकदार, बॉक्साईट वाहतूकदार संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनास कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजने पाठिंबा दर्शविला आहे.