टोल आंदोलनात आज धरण
By admin | Published: September 18, 2014 12:02 AM2014-09-18T00:02:50+5:302014-09-18T00:09:39+5:30
कृती समिती : सलगच्या आंदोलनामुळे घेतली विश्रांतीे
कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त सलग दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आज, बुधवारी आंदोलनास विश्रांती दिली. उद्या, गुरुवारी कॉमर्स कॉलेजच्या दारात सायंकाळी चार वाजता धरणे आंदोलन व कोपरा सभा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे अॅड. बाबा इंदुलकर यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच, टोलप्रश्नी राज्य शासनाकडून तोडगा निघण्याची आशा मावळली. यानंतर संतप्त झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने निवडणुकीच्या मतदानापर्यंत २९ दिवस विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सोमवार व मंगळवार दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी शिवाजी चौकात निदर्शने व काही कार्यकर्त्यांनी मुंडण करीत निषेध व्यक्त केला. सलगच्या आंदोलनामुळे आज कृती समितीने आंदोलन स्थगित ठेवले. उद्यापासून पुन्हा जोमाने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
१०० दिवस कशाला? २९ दिवस बस्स आहेत!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची सत्ता द्या; १०० दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करतो, असे जाहीर आश्वासन दिले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कृती समितीतर्फे बाबा इंदुलकर यांनी पलटवार केला. गेल्या साडेतीन वर्षांत टोलबाबत निर्णय घेऊ शकला नाहीत. न्यायालयातही राज्य शासनाने जाणीवपूर्वक कमकुवत बाजू मांडली. यामुळे १०० दिवसांची पुन्हा वाट पाहत बसण्यापेक्षा येत्या २९ दिवसांत या आघाडी शासनाला घरी बसविलेले कधीही चांगले,
अशी प्रतिक्रिया इंदुलकर
यांनी व्यक्त केली.